मुंबई: बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळण्याबाबत मार्ग मोकळा झालाय. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून देण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयात दिलीय. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा दिलासा मिळालाय. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिट्टी चिन्हाबद्दल वाद निर्माण झाल्याने बहुजन विकास आघाडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
जानेवारी महिन्यात शिट्टी हे निवडणूक चिन्ह म्हणून दिले: निवडणूक आयोगाने जनता दल (युनायटेड) या पक्षाला जानेवारी महिन्यात शिट्टी हे निवडणूक चिन्ह म्हणून दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात जनता दल युनायटेडचा उमेदवार रिंगणात नसल्याने बहुजन विकास आघाडीचा उमेदवार शिट्टी चिन्हावर निवडणूक रिंगणात होता. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन आणि न्यायमूर्ती आरिफ यांच्या खंडपीठासमोर बहुजन विकास आघाडीच्या याचिकेवर सुनावणी झालीय.
आता बविआला शिट्टी निवडणूक चिन्ह हवे: सुनावणीदरम्यान जनता दल युनायटेडकडून निवडणूक आयोगाला मिळालेले पत्र आयोगातर्फे न्यायालयासमोर सादर करण्यात आलंय. त्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक जनता दल युनायटेडतर्फे लढवण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आलीय, या पत्रासंदर्भात निवडणूक आयोगातर्फे न्यायालयाला माहिती देण्यात आली. त्यामुळे या पत्राद्वारे जनता दल युनायटेडने त्यांना निवडणूक आयोगाने ३० जानेवारी रोजी दिलेले चिन्ह परत करत असल्याचे स्पष्ट केले. परंतु याचिकाकर्ते असलेल्या बहुजन विकास आघाडीनं शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केलीय, त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे निवडणूक चिन्ह देण्यात येईल, असे निवडणूक आयोगातर्फे न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या या माहितीनंतर खंडपीठाने बहुजन विकास आघाडीची याचिका निकाली काढली.
बहुजन विकास आघाडीचे आमदार किती? : बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्ह्यात 3 आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार विजयी झाले होते. त्यामध्ये बोईसरमधून राजेश पाटील, नालासोपारा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर आणि वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर हे विजयी झाले होते.
हेही वाचा :