मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (16 डिसेंबर) सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर महायुतीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यावेळी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले, "आमचा प्रयत्न असा होता की, या मंत्रिमंडळात सर्व प्रकारचा चेहरा दिसला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काही जुन्या जाणत्या नेत्यांसोबत काही तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात महिलांनादेखील आम्ही संधी दिली आहे. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी या समाजाचा सुद्धा समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय." तर या मंत्रिमंडळात ज्यांची वर्णी लागली नाही, त्या नाराज नेत्यांची आम्ही समजूत काढू, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला तयार केलाय. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आम्ही निश्चितपणे प्रत्येक मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करुन त्यामध्ये लक्ष देणार आहोत. जर मंत्री योग्य प्रकारे काम करत नसेल, तर त्यावेळी त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल. असं मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना सांगण्यात आलंय."
पुढच्या वेळी घटक पक्षांना सामावून घेऊ : भाजपाच्या काही जुन्या मंत्र्यांचा समावेश नवीन मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात न घेण्याचं कारण म्हणजे पक्षानं त्यांना वेगळी जबाबदारी देण्याचं ठरवलंय. भाजपात अनेकवेळा पक्षाला जबाबदारी द्यायची असेल तर मंत्रिमंडळात स्थान दिलं जात नाही. तसंच काहीजण मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहेत. त्यांचा परफॉर्मन्स नव्हता म्हणूनदेखील त्यांना बाहेर काढण्यात आलंय. यासोबत घटक पक्षांना काही कारणानं सामावून घेता आलं नाही. पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ", असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -