मुंबई : राज्यातील 288 जागांवर मतदान संपल्यानंतर बुधवारी झालेल्या 'एक्झिट पोल'चा अंदाज विविध संस्थांनी जाहीर केला. त्यानुसार, सत्ताधारी महायुती महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज या 'एक्झिट पोल'मधून समोर आलाय. विरोधी महाविकास आघाडीनंही विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन केलं असल्याचं या आकडेवारीवरुन समोर येत आहे. दरम्यान, 'एक्झिट पोल'नुसार हे सर्व अंदाज आहेत. निकाल येत्या 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
'रिपब्लिक टीव्ही-पीएमआरक्यू' एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीला 137-157 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 126-147 आणि इतरांना 2-8 जागा मिळू शकतात. त्यामुळं या पोलनुसार, राज्यात महायुती पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे.
'मॅट्रिझ' एक्झिट पोलने महायुतीला 150-170 जागा आणि महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. इतरांना 8-10 जागा मिळू शकतात, असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यामुळं येथेही महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
'चाणक्या'च्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीला 152-160 जागा, महाविकास आघाडीला 130-138 जागा आणि इतर 6-8 जागा जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला. या पोलनुसारही महायुतीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे.
'पीपल्स पल्स'नं महायुतीला 175-195 जागा मिळवून निर्णायक विजय मिळवण्याचा अंदाज वर्तवलाय. महाविकास आघाडीला 85-112 जागा मिळतील आणि 'इतरांना 7-12 जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवलाय. या पोलनुसार, महायुतीला राज्यात भक्कम बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
महायुतीची पुन्हा सत्ता? : महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा हा 145 इतका आहे. जाहीर झालेल्या 'एक्झिट पोल'नुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुती सत्ता स्थापन करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आकडेवारीनुसार, महाविकास आघाडीनंही टाईट फाईट दिल्याचंही दिसून येत आहे.
'एक्झिट पोल'वरुन राजकारण तापलं : 'एक्झिट पोल'मध्ये महायुतीला जास्त जागा दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळं या पोलवरुन राजकीय वातावरण तापलंय. "'एक्झिट पोल' हा 'Exact' पोल नाही. लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपण 'एक्झिट पोल' आणि निकाल पाहिले आहेत. त्यामुळं महायुतीचेच सरकार येणार," असा दावा शिवसेना नेत्या आणि उमेदवार शायना एनसी यांनी केलाय.
काँग्रेसचा पलटवार : "महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सरकार बनवण्याचा विश्वास आहे. राज्यातील जनता राज्य आणि केंद्रातील सध्याच्या सरकारच्या विरोधात आहे. 'एक्झिट पोल' वास्तविकता दर्शवत नाहीत. लोकांच्या भावना आमच्या सोबत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार," असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. तसंच त्यांनी 'एक्झिट पोल'वरुन महायुती आणि भाजपावर टीका केली.
दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या 'एक्झिट पोल'नुसार वरील सर्व आकडेवारी देण्यात आली आहे. या आकडेवारीबाबत 'ईटीव्ही भारत' कोणताही दावा करत नाही. निवडणूक आयोग अधिकृत निकाल येत्या 23 तारखेला जाहीर करणार आहे.
हेही वाचा