पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सर्व आरोपींना अजून अटक झाली नाही. या हत्या प्रकरणात मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सीआयडी कार्यालयालात शरणागती पत्करली. यावेळी त्याच्या बरोबर त्याचे कार्यकर्ते देखील हजर होते. यावेळी त्याच्या समर्थकांकडून वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी कोणताही संबंध नसून राजकीय कारणांमुळे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
वाल्मिक कराड आमच्यासाठी देव माणूस : वाल्मिक कराड आमच्यासाठी देव माणूस असून वाल्मिक कराड याला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी त्याच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड अखेर आज पुण्यातील सीआयडी कार्यालय येथे स्वतःहून शरण आला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे समर्थक देखील हजर होते.
सुरेश धस, संदीप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळं महाराष्ट्रात सध्या चांगलेच वातावरण तापलं आहे. अखेर वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या निर्णयामुळेच वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला असल्याचं यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कडक कारवाई व्हावी : "आज आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातील आरोपी आहे. आणि याला कोणते कलम लागते ते पाहून किंवा जास्तीत जास्त कराडवर कडक कारवाई करण्याची आम्ही मागणी केली. या प्रकरणातील आरोपी फरार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. आरोपीच्या घरच्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यामुळं वाल्मिक कराडनं नाईलाजानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे धाडसी निर्णय घेतले, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे की, हा खटला प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांनी चालवावा," अशी माहिती यावेळी सुरेश धस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनी पालकमंत्री व्हावे : "बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खून, दरोडे, चोरी, अत्याचार हे प्रकार वाढत आहेत. एखाद्याचे अपहरण करायचे आणि त्याच्याकडून खंडणी वसूल करायची. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळं या सर्व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात कायदा आणि सुवव्यस्था अबाधित राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे, अशी माझी मागणी आहे. जर देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर जिल्हा व्यवस्थित राहील, असा आशावाद धस यांनी व्यक्त केला. जे अन्य आरोपी आहेत, त्यांचीही संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. सीआयडीने आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. आरोपींची लवकरात लवकर संपत्ती जप्त झाली पाहिजे. त्यामुळे आरोपी शरण येतील. यांची संपत्ती जप्त करण्यात यावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल," असा इशारा यावेळी धस यांनी दिला.
अफजल गुरु, कसाबही म्हणायचा मी दोषी नाही : एकीकडे वाल्मीक कराड पुणे सीआयडीला शरण आला आहे. यानंतर आपण संतोष देशमुख हत्येमध्ये दोषी नसून आपला काही याच्याशी संबंध नाही. माझ्यावर राजकीय सूडापोटी आणि हेतूपुरस्सर या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असं वाल्मिक कराड याने म्हटलं आहे, याबाबत सुरेश धस यांना विचारलं असता, "हे बघा जो आरोपी असतो, गुन्हेगार असतो तो गुन्हा केल्यानंतर मी काय केलं नाही, असंच सगळे आरोपी म्हणतात. अफजल गुरू, कसाब यांनी हल्ला केल्यानंतर आम्ही हल्ला केला नाही, आम्ही आरोपी नाहीत, असंच म्हणत होते. त्यामुळं आता वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त केल्यामुळं त्याला नाईलाजाने पोलिसांसमोर यावे लागले आहे. आपण आरोपी नाही, काही केलं नाही, असं त्याला नाईलाजाने म्हणावं लागतंय," असंही धस यांनी म्हटलं.
हेही वाचा :
- सर्व आरोपींची सर्व संपत्ती जप्त करावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल-आमदार सुरेश धस
- बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका
- संतोष देशमुख हत्याकांड : आरोपीला लवकर पकडा, रामदास आठवले यांची मागणी; म्हणाले 'मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार'