मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्रनामा प्रकाशित करण्यात आलाय. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शेतकरी, युवक, महिला आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित केलंय. तसेच महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना महिना 3 हजार रुपये मिळणार असून, महिलांना बस प्रवास मोफत देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय. महाविकास आघाडीनं मुंबईत हॉटेल ट्रायडंटमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, खासदार सय्यद नासीर हुसेन, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, खासदार अभिषेक मनु सिंघवी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत उपस्थित आहेत.
100 दिवसांचा अजेंडा जाहीर: विकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात 100 दिवसांचा अजेंडा जाहीर केला. पदवीधर आणि पदविका असलेल्या बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलंय. जाहीरनाम्यात महाराष्ट्रात नवे औद्योगिक धोरण बनवण्याबाबत सांगितलंय. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा उपस्थितांना संबोधित केलंय. राज्याचे आणि देशाचे मुंबईकडे लक्ष असते. आर्थिक, उद्योग, गुंतवणूक बाबींमध्ये महाराष्ट्र पुढे आहे. राज्याची निवडणूक देशासाठी महत्त्वपूर्ण असून, देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे, असंही मल्लिकार्जुन खरगेंनी अधोरेखित केलंय.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उत्तम प्रशासन मिळणार: ते पुढे म्हणाले की, राज्यातील विद्यमान महायुती सरकारला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उत्तम प्रशासनाची हमी देतो. शेतकरी, तरुणांसाठी निवडणूक महत्त्वाची असून, मुंबईत आलेली व्यक्ती कधीही उपाशी राहत नाही. मुंबई हे सर्वंकष विकासाचे शहर असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार अन् अभ्यास करून हा महाराष्ट्रनामा तयार करण्यात आलाय. मोदी नेहमी काँग्रेसवर खोटेपणाचा आरोप करतात, काल आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय केलं ते सांगितलं, महायुतीची अनैतिक आणि असंविधानिक सत्ता असल्याचाही घणाघातही मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय. भाजपाने पक्षांचे चिन्ह चोरले असून, पन्नास खोके एकदम ओके घरात भरुन ठेवा. महाराष्ट्राचे सरकार खोके सरकार आहे. महाराष्ट्र विकासासाठी आमचा पंचसूत्री कार्यक्रम असल्याचंही मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलं. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 3 लाख रुपयांची मदत देणार असून, लाडकी बहीण योजनासुद्धा आमची कॉपी केलीय. आम्ही कर्नाटकात दोन हजार रुपये आधीच दिलेत, असंही ते म्हणालेत.
खरगेंनी मोदींच्या टीकेतली हवा काढली: मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर देताना मोदींनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संविधानाची लाल रंगाची प्रत देतानाचे छायाचित्र दाखवून मोदींच्या टीकेतली हवा काढून टाकली. मोदी लाल संविधानाचा नेहमी उल्लेख करतात. देवेंद्र फडणवीस कोणत्या शाळेत शिकले माहीत नाही. फडणवीस खोटारडे असून, संविधान नव्हे, तर कोरे कागद असल्याचं सांगतात आणि टीका करतात. मोदी खोट्यांचे शिरोमणी आहेत, अशी टीकाही त्यांनी केलीय. लाल संविधान म्हणजे अर्बन नक्षलवादी असे आरोप करणारे संविधान मोदींनी राष्ट्रपतींना 26 जुलै 2017 ला दिले होते. स्वत: देतात आणि आमच्यावर आरोप करतात, त्यामुळे त्यांना पुन्हा प्राथमिक शाळेत पाठवा, असा हल्ला खरगेंनी चढवलाय. जातीनिहाय जनगणना विकासासाठी फूट पाडण्यासाठी नाही. तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तिथे जातीनिहाय जनगणना सुरू करण्यात आलीय. ही जनगणना जातीजातींमध्ये फूट पाडण्यासाठी नव्हे तर जातींच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांचा अधिक विकास करण्यासाठी केली जात आहे, असंही खरगे म्हणाले. आमच्यावर टीका करणारे नरेंद्र मोदी आणि भाजपा स्वतः मात्र त्यांनी आदिवासी समाजातील राष्ट्रपती केल्याची प्रसिद्धी करतात, यापूर्वी आम्ही दलित समाजातील राष्ट्रपती केले हे भाजपा का सांगते, जनतेत असा संदेश देऊन मते मागणे संविधानाविरोधात आणि देशातील गरीब जनतेसोबत गद्दारी असल्याची टीका खरगेंनी केलीय. किती एससी-एसटी ना तुम्ही महत्त्वाची मंत्रीपदे दिलीत, किती जणांना खऱ्या अर्थाने अधिकार दिले, याचे उत्तर मोदींनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. काँग्रेसने युपीए कालावधीत सर्व समाजाच्या व्यक्तींना महत्त्वाची पदे दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
11 वर्षे झाली तरी बुलेट ट्रेन नाही: 2030 ला छत्रपती शिवाजी महाराजांची 400 व्या जयंती येणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करणार असल्याचे खरगे म्हणालेत. नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींचा हातगुण चांगला आहे का माहीत नाही, पण ते जिथे हात लावला तिथे गोंधळ होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मालवणमध्ये मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा पडला, राम मंदिर उभारले त्यामध्ये पाणी गळती सुरू झाली. मोरबा पुल उद्घाटनापूर्वीच कोसळला, असा टोला त्यांनी लगावला. बुलेट ट्रेन 3 वर्षांत उभारणार होते, मात्र आता 11 वर्षे झाली तरी अद्याप ती ट्रेन आलेली नाही. मोदी सरकारच्या कालावधीत करण्यात आलेल्या कामात गुणवत्ता नसल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींचे डबल इंजिन सरकार रुळावरून घसरले आहे, मविआ सरकार सत्तेवर आल्यावर ही परिस्थिती रुळावर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एकीकडे बटेंगे तो कटेगे अशी घोषणा दिली जाते, मात्र मनुवादी सरकारने आधीच मनुस्मृतीचा स्वीकार करून समाजाला विभाजित केले आहे. मोदी आणि योगी दोघांच्या दोन वेगळ्या भूमिका आहेत. एक है तो सेफ हे असे मोदी म्हणतात, तर बटेंगे तो कटेंगे असे योगी म्हणतात, याकडे खरगेंनी लक्ष वेधले. राजीव गांधी, इंदिरा गांधींनी देश वाचवण्यासाठी बलिदान दिलंय. देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांची हत्या केली गेली. आता भडकावू भाषा वापरून ते लोकांना भडकावत आहेत, असा आरोप त्यांनी केला. वचननामा बनवण्याच्या समितीचे प्रमुख म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुभाष देसाई आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांनी काम पाहिल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
महाविकास आघाडीचे 100 दिवसांचे उद्दिष्ट: प्रत्येकी 500 रुपयांत सहा सिलिंडर, महिलांना मोफत बस प्रवास, महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रति महिना 3 हजार रुपये देणार असल्याचंही जाहीरनाम्यात म्हटलंय. महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी ठोस निर्भया धोरण बनवणार, शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार, बचत गट सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार, शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजार रुपये प्रोत्साहन सूट देणार असल्याचंही खरगेंनी म्हटलंय. तरुण पदवीधर आणि सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4 हजार रुपये देणार असून, युवकांच्या कल्याणासाठी युवा आयोग स्थापन करणार आहोत. राज्य सरकारच्या अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार असून, महात्मा फुले योजनेची व्याप्ती वाढवणार आहोत. नवे औद्योगिक धोरण आखणार असून, सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. जातीनिहाय जनगणना करणार असून, अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाचे हक्काचे बजेट निर्धारित कालमर्यादेत खर्च होण्यासाठी कायदा करणार आहोत. संजय गांधी योजनेसाठी उत्पन्न मर्यादा 21 हजार वरून 50 हजार रुपये करणार आहोत, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत, शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आणि योग्य दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार असून, बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवणार आहोत. शाहू-फुले-आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे नैतिक सरकार स्थापन करणार असून, त्यावर वाटचाल करणार आहोत, असंही जाहीरनाम्यात महाविकास आघाडीनं म्हटलंय.
महाराष्ट्रनामातील इतर आश्वासने: जनता केंद्री सरकार बनवून मिशन 2030 अंतर्गत विविध पावले उचलणार असून, 300 युनिट वापर असलेल्यांना 100 युनिट मोफत देणार आहोत. महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज योजना मिळणार असून, पुढील पाच वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून साडेबारा लाख नवे रोजगार उपलब्ध करणार आहोत, मनरेगा अंतर्गत किमान 200 दिवसांचा रोजगार देणार असून, शहरी रोजगार हमी योजना राबवणार आहोत. मोदी सरकारच्या चार श्रम संहिता रद्द करणार असून, कामगारांचे किमान वेतन 21 हजार करणार आहोत, सरकारी नोकरीतील वर्ग क आणि ड गटात कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करणार नाही, महिला उद्योजिकांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहती निर्माण करणार आहोत. तसेच कृषी आणि फलोत्पादनावर आधारित अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणार, 2.5 लाख रिक्त सरकारी पदे त्वरित एमपीएससी द्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करणार, 45 दिवसांत निकाल लावणार, राज्यातील 27 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत त्या तातडीने घेणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेणार, चैत्यभूमी आंबेडकर स्मारक बनवणे याला प्राधान्य देणार असल्याचंही जाहीरनाम्यात म्हटलं.
मोदी महाराष्ट्रात येऊ नका- राऊत: संजय राऊत म्हणाले, खरगे काय बोलतात ते मोदींना बरोबर कळते. राज्यात चोरांचे सरकार आहे आणि त्यांचे सरदार दिल्लीत बसलेत. विधानसभा निवडणुकीत आधी राज्यातील चोरांना हटवल्यानंतर देशातील चोरांना हटवणार, असा निर्धार त्यांनी केलाय. महाराष्ट्र कुणाचा कधी गुलाम झाला नाही आणि होणार नाही, असेही ते म्हणाले. मोदी-शाह राज्यात तळ ठोकून आहेत, ते दिल्लीत कधी काम करतात ते कळत नाही, अशी टीका त्यांनी केली. मोदी राज्यात येतात तेव्हा अनसेफ होते, त्यामुळे तुम्ही येऊ नका, असा सल्ला त्यांनी मोदींना दिलाय. अमित शाहांना अजून महाराष्ट्र कळलेला नाही, आधी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर त्यांनी बोलावे, असे राऊत म्हणालेत.
महाविकास आघाडीची पंचसूत्री
1- महालक्ष्मी
महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन
बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा
2- समानतेची हमी
जातीय जनगणना करण्याचे आश्वासन
50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याची चर्चा
3- कौटुंबिक संरक्षण
25 लाखांपर्यंत आरोग्य विम्याचे आश्वासन
मोफत औषधांची सुविधा
4- कृषी समृद्धी
शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचं आश्वासन
नियमित कर्ज परतफेडीवर 50,000 रुपयांचे प्रोत्साहन
5- तरुणांना वचन
बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांची आर्थिक मदत
हेही वाचा