मुंबई : मराठी माणसाची मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा कार्यक्रम मोदी-शाह यांनी आखलाय. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू आहे. मुंबईची ब्ल्यू प्रिंट नीती आयोगाला देऊन महापालिकेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे, मुंबईवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर काटेंगे, असा इशारा उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिलाय. दरम्यान, उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी थांबणार असून, महायुतीच्या प्रचाराच्या थापासुद्धा थंडावणार आहेत. महायुतीनं केलेल्या घोषणा सुद्धा त्यांच्यासारख्याच फसव्या आहेत. परंतु आम्ही जनतेला दिलेल्या वचननाम्यामधील प्रत्येक वचनामागे पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याचं आम्ही आश्वासन दिलंय. कारण आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी-शाह आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार प्रहार केलाय.
मर्द असाल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो वापरा: महापुरुषांच्या नावाच्या यादीत यांनी बाळासाहेब यांचे नाव टाकले. त्यावेळी आम्हाला आनंद झाला होता, मात्र हा त्यांचा डाव होता हे स्पष्ट झालंय. कारण महापुरुषांच्या यादीत जर नाव गेले तर त्या व्यक्तीचा फोटो कोणीही वापरू शकतो. म्हणून हे बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. जर मर्दाची अवलाद असाल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केलंय.
म्हणून एकही जागा सोडली नाही : आम्हाला विचारले जाते की, एक जागा का सोडली नाही? महाराष्ट्रद्रोह्यांना एकही जागा सोडायची नाही. कारण जर आम्ही एक जागा यांना सोडली असती तर यांनी जाऊन महाराष्ट्रद्रोह्यांनाच साथ दिली असती. माझं नातं महाराष्ट्राशी आहे, म्हणून एक जागा सोडली नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई विकायचे काम : मोदी आणि शाह यांनी मुंबई अदानीला विकायचे काम सुरू केलंय. धारावी, मुंबई आणि आसपासचा परिसर, मिठागरे, वीज अदानींची, बंदरं अदानींची, विमानतळ अदानींकडे त्यामुळे अदानींची सुलतानी आता संपवायला पाहिजे, असंही यावेळी ठाकरे म्हणालेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा यांचा डाव असून, आता नीती आयोगाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचे महत्त्व किमी केले जातंय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात करार केला जातोय. असे करून जर मुंबई संपवणार असाल तर आम्ही सत्तेत येतात एमएमआरडीएसुद्धा रद्द करू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
सोयाबीनला 7 हजार रुपये भाव देणार : महायुती सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणले असून, शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. आमचे सरकार असताना आम्ही सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव दिला होता, आता पुन्हा सत्तेत येतात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव देणार आहोत, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गद्दारांना धडा शिकवण्याचा महाराजांचा कित्ता गिरवा : यावेळी बोलताना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्रात गद्दारांचे सरकार आहे. महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या गद्दारांना छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने शासन केले आणि ठेचून काढले, त्या पद्धतीने आता गद्दारांना ठेचण्याची वेळ आलीय असे, गायकवाड म्हणाल्या. ज्यांना महाराजांचा पुतळा सांभाळता येत नाही, त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या, घरगड्यासारखे वागवणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची हीच वेळ आहे. महिलांच्या संरक्षणासाठी, महागाई कमी करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केलंय.
हेही वाचा-