मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपा महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागलाय. या निकालाचे कवित्व आणखी काही काळ सुरू राहणार आहे. महाविकास आघाडीच्या अनेक पराभूत उमेदवारांनी या निकालाचे खापर ईव्हीएमवरदेखील अप्रत्यक्षरीत्या फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यातूनच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन तपासणी अन् पडताळणीचे अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आलेत. ईव्हीएममध्ये घोळ आहे की नाही हे यातून सिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 95 विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी अन् पडताळणीसाठी एकूण 104 अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत.
पाच जिल्ह्यांतून एकही अर्ज नाही : उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा, नंदुरबार आणि अमरावती या पाच जिल्ह्यांतील एकाही उमेदवाराने ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही. 104 जणांनी तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केलेत. त्यामधून राज्यातील 1 लाख 486 मतदान केंद्रांपैकी 755 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याची मागणी समोर आलीय. ज्या उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीसाठी अर्ज केलेत, त्यांना तपासणीच्या तारखेआधी तीन दिवस अगोदर त्यांचा अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आलीय. जर उमेदवाराने अर्ज मागे घेतले तर त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणीसाठी जमा केलेले शुल्क परत करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने कळविलंय.
ईव्हीएमचे कामकाज योग्य प्रकारे सुरू : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या मायक्रो कंट्रोलर बर्न मेमरीच्या तपासणी आणि पडताळणीसाठी ज्या ठिकाणी निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली नाही, अशा ठिकाणी त्या संचातील डेटा क्लिअर करण्यात येतो आणि त्यानंतर अभिरूप मतदान घेण्यात येते. त्यावेळी कंट्रोल युनिटमधील डेटा आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप यांची आकडेवारी जुळते की नाही याचे निरीक्षण करण्यात येते. जर ती आकडेवारी जुळत असेल तर संबंधित संचातील ईव्हीएमचे कामकाज योग्य प्रकारे चालले आहे, याची खात्री होते, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, कर्जत जामखेडचे उमेदवार, भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे, मुंबईतील अणुशक्ती नगरमधील उमेदवार फहाद अहमद, साकीनाका येथील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री आरिफ नसीम खान, एकनाथ शिंदे यांच्या समोर उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केदार दिघे, ठाणे शहरमधील उमेदवार राजन विचारे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिष ठाकूर या प्रमुख पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केलेत.
हेही वाचा :