मुंबई- काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या राज्यातील 22 मतदारसंघांतील 28 बंडखोरांविरोधात निलंबनाची कारवाई केलीय. काँग्रेसने पहिल्या यादीत 16 मतदारसंघांतील 21 उमेदवारांविरोधात निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत 6 मतदारसंघांतील 7 बंडखोरांचा समावेश आहे. पुढील सहा वर्षांसाठी या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार बंडखोरांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिलीय. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याने पक्षाने हे निलंबनाचे पाऊल उचललंय.
बंडखोरीमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता : पक्षादेश डावलून अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांमुळे काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्यात कुठल्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिलाय. राज्यातील कोणत्याही बंडखोराला पाठीशी घातले जाणार नाही, सर्व बंडखोरांविरोधात निलंबनाची कारवाई होईल, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असलेल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेना उबाठातर्फे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवलाय. त्यामुळे मविआचे अधिकृत उमेदवार केदार दिघे यांना अडथळा निर्माण झालाय. एकीकडे बंडखोरांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले जात असताना बंडखोर उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यास मात्र त्याला पक्षात सामावून घेतले जात असल्याने निलंबनाची ही कारवाई किती गंभीरपणे केली जाते, याकडे साशंकतेने पाहिले जाते.
सांगलीत जयश्री पाटलांची बंडखोरी : सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती, मात्र ते विजयी झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना सहयोगी सदस्य म्हणून सामावून घेतले. आता ही सांगलीत जयश्री पाटलांनी बंडखोरी केलीय. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात त्या रिंगणात आहेत आणि खासदार विशाल पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे यावेळी देखील सांगली पॅटर्न चालतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कुणाचे झाले निलंबन : आरमोरी - आनंदराव गेडाम आणि शीलू चिमुरकर, गडचिरोली -सोनल कोवे आणि भरत येरमे, बल्लारपूर - अभिलाषा गावतुरे आणि राजू झोडे, भंडारा - प्रेम सागर गणवीर, अर्जुनी मोरगाव - अजय लांजेवार, भिवंडी- विलास रघुनाथ पाटील व आसमा चिखलेकर, मीरा-भाईंदर- हंस कुमार पांडे, कसबा पेठ - कमल व्यवहारे, पलूस कडेगाव-मोहनराव दांडेकर, अहमदनगर शहर-मंगला विलास भुजबळ, कोपरी पाचपाखाडी - मनोज शिंदे आणि सुरेश पाटील-खेडे, उमरखेड -विजय खडसे, यवतमाळ -शब्बीर खान, राजापूर- अविनाश लाड, काटोल याज्ञवल्क्य जिजकार, रामटेक- राजेंद्र मुळूक, सिंदखेडा -शामकांत सनेर , श्रीवर्धन -राजेंद्र ठाकूर, पर्वती- आबा बागुल, शिवाजीनगर -मनीष आनंद, परतूर -सुरेश कुमार जेथलिया आणि कल्याण बोराडे, रामटेक- चंद्रपाल चौकसे
हेही वाचा -