मुंबई - २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला असून, निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत ते सातत्याने पक्ष फोडणाऱ्यांवर आगपाखड करताना दिसतायत. यापूर्वी डोंबिवली तर आता कोकणात गुहागर येथे घेतलेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा पक्ष फोडणाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना, तर अजित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलाय. विशेष म्हणजे राज्यात महायुतीची सत्ता येणार आणि त्या सत्तेत मनसेचा सहभाग असणार, असे म्हणणारे राज ठाकरे आता मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सतत टीका करण्याचे नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिडून, भडकून दूर लोटा: राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि मनसेचा त्यात सहभाग असणार, असं ठामपणे सांगणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता महायुतीच्या नेत्यांवरच आगपाखड करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत पाडलेली फूट आणि दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाडलेली फूट यावरून राज ठाकरे या नेत्यांना सभेमध्ये त्यांच्या शैलीत चिमटे काढताहेत. कोकणातील गुहागर येथे राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मनसेच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतलीय. याप्रसंगी बोलताना राज ठाकरे म्हणाले आहेत की, मागील पाच वर्षात या सर्व लोकांनी राजकारणामध्ये मोठा गोंधळ घातलाय. काही या पक्षातून त्या पक्षात, काही त्या पक्षातून या पक्षात, तर काही पक्ष सोबतच घेऊन दुसरीकडे गेलेत आणि जोपर्यंत त्यांनी हे सर्व बरोबर केले असा त्यांचा जो समज आहे, तो चिडून, भडकून आपण दूर करत नाही, तोपर्यंत विकासाची स्वप्न विसरून जा, याकरिता आधी या सर्वांना बाजूला सारत यांना घरी बसवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील उमेदवारांना तुम्ही विजयी करा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय.
लोकसभेला झाला होता फायदा: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंच्या सभेचा महायुतीला फायदा झाला होता, याकरिता विधानसभेलासुद्धा राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा अट्टहास भाजपाने धरला होता. राज ठाकरे यांची आक्रमक भाषण शैली आणि त्यांच्या सभेला मिळणारा अस्फूर्त प्रतिसाद याचा यथोचित फायदा करून घेण्यासाठी महायुतीकडून राज ठाकरे यांना त्यांच्यासोबत घेण्याचे अनेक प्रयत्न झालेत. परंतु राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत न जाता स्वबळाचा नारा दिला. तरीही राज ठाकरे महायुतीसोबत सत्तेत राहतील, असं चित्र दिसत होतं. परंतु माहीमच्या जागेवरून यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आणि राज ठाकरे आता पूर्णपणे आक्रमक झालेत. यापूर्वी डोंबिवली येथे घेतलेल्या प्रचार सभेतही राज ठाकरे यांनी खरी शिवसेना ही ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे यांची तर ती बाळासाहेबांची असल्याचं ठामपणे सांगितलं. त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांची नसून ती शरद पवार यांचीच असल्याचं जाहीर केलंय. यावरून राज ठाकरे यांचा महायुतीबद्दलचा मूड आता बदलला असल्याचं दिसतंय. यंदा राज्यात बंडखोरांचे प्रमाणही फार मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला रंग चढत असताना राज ठाकरे यांची सातत्याने महायुतीवर होणारी टीका पुढे महायुतीच्या उमेदवारांसाठी धोक्याची ठरू शकते.
राज ठाकरे का दुखावले? : राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेबाबत बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले आहेत की, सुरुवातीला राज ठाकरे यांची भूमिका महायुतीबाबत, "मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा" अशा पद्धतीची होती. परंतु त्यांचे पुत्र अमित ठाकरे ज्या माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तिथून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्याने हा वाद चिघळला. भाजपाने यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. आता माहीम विधानसभेची निवडणूक ही अतिशय अटीतटीची होणार यात शंका नाही. महायुतीच्या या निर्णयाने नक्कीच राज ठाकरे दुखावले गेलेत. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनीही आता आरपारची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
हेही वाचा