मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होत असल्यानं राज्यभरात प्रचारासाठी कमी वेळेत पोचण्यासाठी राजकीय नेत्यांची हवाई प्रवासाला नेहमी पसंती असते. मात्र विमानानं प्रत्येक ठिकाणी पोचण्यासाठी विमानतळ उपलब्ध नसल्यानं हेलिकॉप्टर प्रवासाला नेत्यांचं प्राधान्य असतं. या निवडणुकीसाठी देखील राज्यातील हेलिकॉप्टर महायुतीच्या घटक पक्षांनी आरक्षित करुन ठेवली आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बाहेरील राज्यातील हेलिकॉप्टर हवाई प्रवासासाठी आरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली.
हेलिकॉप्टर प्रवासाला प्राधान्य : राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या नेत्यांचा कल चार्टर्ड विमान वापरण्याकडे असतो, कारण त्यांना अधिक प्रवास करावा लागतो. राज्यातील प्रमुख नेते देखील चार्टर्ड विमानानं मोठ्या शहरातील विमानतळापर्यंत या विमानांनी जावून पुढील प्रवास हेलिकॉप्टरनं करणार आहेत. रस्ते मार्गानं प्रवास करण्यामध्ये वेळेचा अपव्यय होत असल्यानं प्रचाराच्या कालावधीत मुल्यवान वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर प्रवासाला नेत्यांनी प्राधान्य दिलं.
ट्वीन इंजिनला जास्त पसंती : ट्वीन इंजिन व सिंगल इंजिन असे दोन प्रकार हेलिकॉप्टरमध्ये उपलब्ध आहेत. मात्र ट्वीन इंजिन म्हणजे त्यामध्ये दोन इंजिन असल्यानं हे हेलिकॉप्टर सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टर पेक्षा जास्त सुरक्षित मानलं जातं. या हेलिकॉप्टरची आसन क्षमता देखील 8 ते 12 प्रवासी अशी असते. त्यामुळं या हेलिकॉप्टरना जास्त मागणी आहे. या हेलिकॉप्टरसाठी प्रति तास सुमारे 3 ते 5 लाख रुपये दर आकारला जातो. हेलिकॉप्टरद्वारे एका वेळी कमाल 2 तासांचा प्रवास सलगपणे करता येतो. त्यापेक्षा जास्त प्रवास करायचा असल्यास हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्यासाठी ब्रेक घ्यावा लागतो. त्यामुळं जास्त अंतर प्रवास करायचा असल्यास छोटी विमानं वापरली जातात.
हेलिकॉप्टर प्रवासातील धोका : हेलिकॉप्टर प्रवासात वेळ वाचत असला तरी यामध्ये धोका देखील आहे. अनेकदा ढगाळ वातावरण, जोरदार वारा, कमी दृश्यमानता अशा प्रसंगात हेलिकॉप्टर उडवणं धोकादायक ठरतं. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात अवघ्या 15 फुटांपर्यंत खाली आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लॅंडिंग झाले होते. मात्र सुदैवानं ते त्यातून बचावले होते. 2009 मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.
आमच्याकडे ट्वीन इंजिनचे 5 हेलिकॉप्टर व 4 छोटी विमाने आहेत. हेलिकॉप्टरमध्ये 4 ते 8 प्रवासी बसू शकतात, तर विमानांमध्ये 6 ते 13 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. आमच्याकडील सर्व हेलिकॉप्टर व छोटी विमानं आरक्षित करण्यात आली आहेत. - नेहल मोटा, एमएबी एव्हिएशन प्रा. लि. मुंबई
हेही वाचा