मुंबई - राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू असताना बंडखोर उमेदवारांचा मोठा धसका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय. राज्यात एकूण 288 विधानसभेच्या जागांसाठी 4140 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेत बहुमतासाठी 145 चा जादुई आकडा गाठणं गरजेचं आहे. मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या जागांपेक्षा जास्त बंडखोरांची संख्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळतेय. जवळपास 157 बंडखोर उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं उपद्रवमूल्य सिद्ध करणार आहेत. निकालानंतर हे बंडखोर विजयाचा गुलाल उधळतात की, यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन तिसऱ्याचाच फायदा होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तसेच या बंडखोरांंपैकी अनेकजण हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
तिकिटासाठी उड्या मारल्याने बंडखोरांचं प्रमाण वाढलं : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला दारुण पराभव लक्षात घेता महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी जास्तीत जास्त उमेदवार राज्यात लढवण्यावर भर दिलाय. यामध्ये भाजपाने बाजी मारली असली तरीसुद्धा भाजपा पक्षातच बंडखोरांचे प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटाचे बंडखोरसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीमध्येही तीच परिस्थिती आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी शरद पवार यांच्या पक्षातही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. लोकसभेला डावलले त्यानंतर विधानसभेलाही तिकीट नाही दिले म्हणून नाराज होऊन हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय आणि त्यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली. पण याच ठिकाणी प्रवीण माने यांनी नाराजी व्यक्त करत हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर बंडखोरी केलीय. पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 11 मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रवी राणांच्या विरोधात तुषार भारतीयांची बंडखोरी : बीड मतदारसंघात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना अजित पवार गटाने पुन्हा उमेदवारी दिली असली तरी त्यांच्यासमोर ज्योती मेटे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार तुषार राठोड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, शिंदे सेनेचे नेते बालाजी पाटील खतगावकर यांनी बंडखोरी केलीय. अमरावतीतील बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात भाजपाचे तुषार भारतीय यांनी बंडखोरी केलीय. त्याचप्रमाणे काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख यांच्या विरोधात शिवसेना (उबाठा)च्या प्रीती बंड यांनी बंडखोरी करून आव्हान कायम ठेवलं आहे. नागपूर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा)चे विशाल बरबटे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी दंड थोपटलेत.
बंडखोरांवर कारवाईला सुरुवात : बंडखोरी शमवण्यासाठी सर्वच पक्षांनी अखेरच्या क्षणापर्यंत बरेच प्रयत्न केले. त्यांना काही ठिकाणी यश आलं, तर अनेक ठिकाणी अपयशच आलं. भाजपाने त्यांच्या पक्षातील 40 बंडखोरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केलीय. तशा पद्धतीचा आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलाय. असं असलं तरी हा आकडा कमी असून, अजूनही अनेक बंडखोरांवर कारवाई करण्यात आलेली नाही. शिर्डीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या राजेंद्र पिपाडा यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. अहमदपूरमध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश हाके यांच्यावरही काही कारवाई झाली नाही. तसेच रिसोडमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख हेसुद्धा बंडखोर असून, त्यांच्यावरही कुठलीही कारवाई भाजपाकडून करण्यात आली नाही.
बंडखोरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी : बंडखोरांवर केलेल्या कारवाईबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे पदाधिकारी मित्र पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत अथवा मित्रपक्ष सोडून दुसऱ्यांचा प्रचार करतील. त्याचप्रमाणे जे पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करण्यात सामील असतील त्यांना पक्षात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. म्हणून यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपाप्रमाणे काँग्रेसनेसुद्धा बंडखोरांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलीय. राज्याचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच उद्धव ठाकरे यांनी वणी विधानसभेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, मोरेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, झरीचे तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगल, यवतमाळचे प्रसाद कोठारे, तसेच भिवंडीतून रुपेश म्हात्रे यांचीही पक्षातून हकालपट्टी केलीय.
बंडखोर ठाम राहिल्याने होणाऱ्या महत्त्वाच्या लढती
1. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) विरुद्ध राजेंद्र पिपाडा (भाजप बंडखोर)
2. नांदगाव - सुहास कांदे (शिंदे सेना) विरुद्ध समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर)
3. शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे) विरुद्ध नाना अंबोले (भाजपचे बंडखोर)
4. कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड (भाजप) विरुद्ध महेश गायकवाड (शिंदे सेना)
5. मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप) विरुद्ध गीता जैन (भाजपचे बंडखोर)
6. मानखुर्द शिवाजीनगर - नवाब मलिक ( अजित पवार गट) विरुद्ध सुरेश पाटील (शिंदे सेना)
7. देवळाली - सरोज अहिरे (अजित पवार गट) विरुद्ध राजश्री अहिरराव (शिंदे सेना)
8. मोर्शी - देवेंद्र भुयार (अजित पवार गट) विरुद्ध उमेश यावलकर (भाजपचे बंडखोर)
9. आष्टी - बाळासाहेब आजबे (अजित पवार गट) विरुद्ध सुरेश धस (भाजप) विरुद्ध भीमराव धोंडे (भाजपचे बंडखोर)
10. सिंदखेड राजा - शशिकांत खेडेकर (शिंदे सेना) विरुद्ध मनोज कायंदे (अजित पवार गट)
11. सांगली - पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) विरुद्ध जयश्री पाटील (काँग्रेसच्या बंडखोर)
12. पंढरपूर - अनिल सावंत (राष्ट्रवादी शरद पवार गट) विरुद्ध भगीरथ भालके (काँग्रेसचे बंडखोर)
13. जळगाव शहर - जयश्री महाजन (उबाठा गट) विरुद्ध कुलभूषण पाटील (शिंदे सेना)
हेही वाचा -