पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत दोनपेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावीत," असं म्हटलं आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की, हे दुर्दैवी आहे, हम दो हमारे दो हे कॅम्पेन सुरू होत असले तरीही भारत सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. आज देशात दारिद्र्याची परिस्थिती ही खूपच वाईट आहे. जरी आपण विकसित राष्ट्र म्हणून घोषणा केली असली तरी वास्तव हे खूपच बिकट आहे. तसेच मोहन भागवत आणि भाजपा हे फॅसिस्ट विचारांचे असून, त्यांनी हिटलरकडून प्रेरणा घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर आपलं म्हणणं मांडलं पाहिजे की, मोहन भागवतांचे विधान आहे, त्यांच्याशी ते सहमत आहेत का? असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
सोनिया गांधी यांचा त्याग मोठा : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधी यांचा त्याग किती मोठा होता, त्या आठवणी पृथ्वीराज चव्हाणांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितल्यात.
जनतेचा विश्वास ईव्हीएमवर राहिला नाही : तसेच पृथ्वीराज चव्हाण यांना ईव्हीएमबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सामान्य जनतेचा विश्वास ईव्हीएमवर राहिला नाही. आज जगात कुठेचं इलेक्ट्रॉनिक मशीनवर मतदान होत नाही. राज्यात जे निकाल लागले आहेत, त्या निकालाबद्दल कोणालाच विश्वास बसत नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी विरोधात वातावरण होतं. तेव्हा ते आम्हाला जाणवलं होतं. आज आम्ही 7 निवडणुका लढवल्या आहेत. आम्हाला हवेचा अंदाज असतो. मात्र आताचा हा निकाल लागला, त्यावर कोणाचाच विश्वास नाहीये. माझं म्हणणं आहे सगळ्या व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करायला काय अडचण आहे, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. निवडणूक आयुक्तांनी गुन्हा दाखल करणार असं म्हटलं आहे, याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा. लोकशाही टिकवायची असेल तर हे स्पष्ट होणं महत्वाचं आहे. चोकलिंगम यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
त्यांना भारतीय लोकशाही बळकट करण्याची संधी होती : अदानींसंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं असता ते म्हणाले की, अदानींवर अमेरिकेत गुन्हा दाखल झालाय. भारतात अदानींनी भ्रष्टाचार केलाय हे अमेरिकेला कळतं, पण ते भारताला कळत नाही. शरद पवार आणि अदानी याबद्दल काही बोलायचं नाही, यासंदर्भात प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं. पण जर अमेरिकेला कळाल्यानंतर ते गुन्हा दाखल करू शकतात, तर आपण का नाही, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यांना भारतीय लोकशाही बळकट करण्याची संधी होती. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी अनेक निर्णय घेतले, पण लोकशाही बळकट करण्याचा निर्णय त्यांनी टाळला आणि एक बेकायदेशीर सरकार राज्यात त्यांनी चालू दिलं. आता याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल, असंही यावेळी चव्हाण म्हणालेत.
हेही वाचा