मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. याबरोबरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही एका जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आपली भूमिका मांडलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय.
मनसेच्या जाहीरनाम्यात मूलभूत प्रश्न : मनसेने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात जनतेच्या मूलभूत गरजांचा, प्रश्नांचा समावेश असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यामध्ये महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार यांचा समावेश आहे. सोबतच दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळी जमीन, पर्यावरण, इंटरनेट इत्यादी प्रगतीच्या संधी, राज्याचे औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी, पर्यटन या विषयांचा समावेश आहे. यातच मराठी अस्मिता, डिजिटल युगातील मराठी, मराठीचा दैनंदिन वापर, गड-किल्ल्यांचे संवर्धन इत्यादी गोष्टींशी निगडीत समस्या कशा सोडवल्या जातील, याचाही उपाय या जाहीरनाम्यात देण्यात आलाय.
मराठी भाषेसाठी काय करणार हेसुद्धा सांगितलंय : यावेळी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, आम्ही खूप तपशिलात जाऊन काम केलंय. हे तुम्हीही लक्षात घ्या, इतरांनी केवळ जाहीरनामा मांडलाय. पण आम्ही जाहीरनाम्यात कोणती कामं करणार आणि ती कशी करणार हेदेखील मांडलंय. काही वर्षांपूर्वी मी ब्लू प्रिंट मांडली होती. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. प्रशासनापासून ते अगदी उच्च शिक्षणापर्यंत मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी काय करणार हेदेखील आमच्या जाहीरनाम्यात आम्ही मांडलय. राज ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही प्रसिद्ध केलेला जाहीरनामा सत्तेच्या अनुषंगाने दिलाय. इतर पक्षांनीही आपले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत. त्यांना खात्री आहे की, ते जिंकतील? इतरांनी माझ्यापेक्षा कमी उमेदवार दिलेत. तुम्ही कोणत्या युतीसोबत बसलात? त्या आघाडीत सहभागी असलेले विविध पक्ष वेगवेगळे होर्डिंग लावत आहेत, याचाही जरा विचार करा, असा सल्लादेखील माध्यमांना दिलाय.
हेही वाचा