नंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 84 वर्षीय अर्धांगवायूनं त्रस्त असलेल्या महिलेनं मतदान करण्याची इच्छा दाखवल्यानंतर मुलानं चक्क ॲम्बुलन्समधून नेत वृद्ध आईची मतदान करण्याची इच्छा पूर्ण केली. याकरिता प्रशासनाकडून स्ट्रेचरवर असलेल्या वयोवृद्ध महिलेनं आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या 12D फार्म भरला न गेल्यामुळं वयोवृद्ध महिलेला मतदान केंद्रावर ॲम्बुलन्सद्वारे आणून मतदान करविण्यात आलं आहे.
वयोवृद्ध महिलेनं केलं मतदान : नंदुरबार शहरातल्या अमर टॉकीज शेजारच्या नगरपालिकेच्या शाळेत एका 84 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा चक्क ॲम्बुलन्सनं आणून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. श्रीमती दयावती बिपिनचंद्र देसाई असं या वृद्ध महिलेचं नाव असून या महिलेला अर्धांगवायू आजार झाला आहे. त्यामुळं त्या बेडवरच आहेत. प्रशासनाकडून उपलब्ध असलेल्या 12D फार्म भरला न गेल्यामुळं मतदान होऊ शकत नव्हतं. मात्र, त्यांची मतदानाची प्रबळ इच्छा असल्यानं त्यांच्या मुलानं रुग्णवाहिकेद्वारे त्यांना मतदान केंद्रात आणून मतदानाची प्रक्रिया पार पडली. दयावती देसाई यांनी स्ट्रेचरवरूनच मतदान केलं आहे.
प्रशासनाकडून मतदान हक्क बजविण्यासाठी सहकार्य : वयोवृद्ध महिलेला मतदान करण्याची इच्छा जागृत झाल्यानंतर मुलानं मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ॲम्बुलन्सद्वारे वयोवृद्ध महिलेला मतदान केंद्रात आणावं असं सांगितलं. त्यानंतर मुलानं ॲम्बुलन्सद्वारे मतदान केंद्रावर आणून मतदानाचा हक्क बजाविला. प्रशासनानं मदत केल्यामुळं महिलेची मतदान करण्याची इच्छा पूर्ण झाली.
बहुसंख्य वृद्ध मतदारांची हजेरी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात एका 95 वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केलं आहे. वृद्ध नागरिकांची उपस्थिती तरुणाईला प्रेरित करणारी ठरत असून बहुसंख्य वृद्ध मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याच पाहायला मिळालं.
हेही वाचा