मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालंय. तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. म्हणून आता महाविकास आघाडीकडून पराभवाची कारणमीमांसा शोधली जातेय. पराभवाचे आत्मपरीक्षण केलं जातंय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितपणे चांगलं यश मिळालं असून, विधानसभा निवडणुकीत त्यांना अतिआत्मविश्वास नडला, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी काँग्रेसवर केलीय. गुरुवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्रिपदासाठी 10 नेते इच्छुक : पुढे बोलताना दानवे म्हणाले की, काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रिपदावर चर्चा करीत होते. त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी 10 नेते इच्छुक होते. उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं असतं तर त्याचा फायदा झाला असता, असं दानवे म्हणालेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्यानंतर काँग्रेसचा मनात अतिआत्मविश्वास आला असावा. हे माझं व्यक्तिगत मत आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले. वातावरण, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती हे बघून त्या त्यावेळी निर्णय घेतले जातील. तर दुसरीकडे अजून वर्षभर तरी पालिका निवडणुका होतील, असं वाटतं नसल्याचं दानवे म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता कमीच : विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचे 20 पेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत. तर राज ठाकरे यांच्या मनसेला खातेही उघडता आलेले नाही. यामुळं आता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी जनतेची इच्छा आहे. त्यासंदर्भातील प्रश्न दानवेंना विचारला असता ते म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी कुणाची भावना नाही. मनसे कोणाच्या बाजूने होती आणि कोणाच्या विरोधात होती, याची भूमिका त्यांनी स्पष्ट करायला हवी. मनसेत वैचारिक गोंधळ होता. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आमच्याकडे शून्य चर्चा आहे. वंचितने इतरांचे उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढवली होती. ते जिंकण्यासाठी उभे राहत नाहीत, असा टोला वंचितला अंबादास दानवेंनी लगावलाय.
स्वबळाचा नारा नाही : पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळाचा नारा दिल्याचं मी काहीही बोललो नाही. पक्षाने ताकद निर्माण केली पाहिजे. निवडणुका कधी होतील याचा भरवसा नाही. न्यायालयाने आता जानेवारी महिन्याची तारीख दिलीय. पक्षाने सर्व मतदारसंघात ताकद निर्माण केली पाहिजे. सध्या मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री भाजपाचाच होईल, असं वाटतंय. एवढ्या जागा जिंकल्यावर कोणताही पक्ष मुख्यमंत्रिपद दुसऱ्याला देणार नाही. पक्ष स्वतंत्र विचार करीत असतो. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाचे नेतृत्व योग्य निर्णय घेईल. रिफायनरीबाबत उदय सामंत यांनीच आक्रमक भूमिका घेतली होती. प्रदूषणकारी प्रकल्प आपल्याकडे येतात आणि चांगले प्रकल्प गुजरातला जातात, अशी टीका अंबादास दानवेंनी सरकारवर केलीय.
हेही वाचा :