मुंबई - मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे मुंबई भाजपाचे सचिव सचिन शिंदेंनी अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे. माहीम मतदारसंघातून सातत्याने काम करूनही विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शिंदे यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अदानी प्रकरण आणि विनोद तावडे प्रकरणावरून भाजपाला टोला लगावलाय.
सचिन शिंदे हे विधानसभा उमेदवारीसाठी उत्सुक: दादर-माहीम मतदारसंघात मागील काही वर्षांपासून पक्षाच्या माध्यमातून विविध कामे करणाऱ्या भाजपाचे सचिव सचिन शिंदे हे विधानसभा उमेदवारीसाठी उत्सुक होते. मात्र, महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा सदा सरवणकर यांना संधी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सचिन शिंदे यांनी भाजपाला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय. उद्योजक असलेल्या सचिन शिंदे यांनी उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केलाय. सचिन शिंदेंच्या प्रवेशामुळे दादर-माहीम मतदारसंघात पक्ष संघटनेला आणखी बळकटी येणार आहे, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
...तर त्याचा स्फोट आणखी मोठा झाला असता: या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 19 तारखेला वसई-विरारमध्ये एक बॉम्ब फुटला. तो पैशांचा बॉम्ब होता. वसई-विरारमध्ये झालेला सर्व प्रकार लोकांनी पाहिलाय. काल आणखी एक बॉम्ब फुटला. तो जर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट आणखी मोठा झाला असता. काल अदानी समूहावर आरोप झाले त्याची गंभीरता मोठी आहे. त्यामुळे संपूर्ण देश हादरलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घोटाळा कसा काय होऊ शकतो हा इथल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. आता या घोटाळेबाजांचं काय करणार? हे केंद्र सरकारला विचारायला हवं, असंही ठाकरे म्हणालेत.
भाजपामध्ये आपल्यावर अन्याय झाला नाही: दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सचिन शिंदे म्हणाले की, भाजपामध्ये आपल्यावर अन्याय झाला नाही, मात्र आपल्याला योग्य संधीही मिळाली नाही. भाजपामधले अनेक कार्यकर्ते आजही आपल्या पाठीशी आहेत आणि यापुढेही त्यांचे आपल्याला सहकार्य लाभेल, कारण लोकसेवेच्या व्रताला वचनबद्ध राहून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण सतत कार्यरत राहू, हा निर्णय आपण कोणाविषयी नाराजीने नाही, तर व्यापक लोकसेवेसाठी घेतलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नक्कीच आपल्याला संधी मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा -