मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही अद्यापही सरकार स्थापन होत नाहीये. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नसल्यामुळं आणि कोणाला किती मंत्रिपदं, कुठली खाती द्यायची यावरून निर्णय होत नसल्यामुळं शपथविधीला विलंब होतोय. दरम्यान, पाच डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील दरे गावावरून रविवारी ठाण्यात परतल्यानंतर सोमवारी महायुतीतील अनेक बैठका होणार होत्या. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या सर्व बैठका रद्द केल्यात.
आराम करण्याचा सल्ला : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कणकण अन् ताप होता. त्यामुळं ते विश्रांतीसाठी साताऱ्यातील आपल्या दरे या गावी गेले होते. डॉक्टरांचं पथक दाखल होत त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करण्यात आले होते. रविवारी ते ठाण्यात परत आल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदेंच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सरकार स्थापनेच्या धर्तीवर आज महायुतीत काही बैठक होणार होत्या. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावल्यामुळं त्यांना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलाय. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आजच्या दिवसभरातील सर्व बैठका रद्द केल्याची माहिती समोर येतेय.
दुसरीकडे सागर बंगल्यावर नेत्यांची रिघ : एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावल्यानं त्यांनी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्यात. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नेत्यांची मोठी रिघ लागल्याचं चित्र दिसत आहे. माधुरी मिसाळ, गिरीश महाजन, राहुल नार्वेकर, चंद्रकांत पाटील आदी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर गर्दी केली होती. तसेच महायुतीचा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. तिथली पाहणी करण्यासाठी नेते आझाद मैदानावर जाताना दिसताहेत.
हेही वाचा :