मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही महायुतीत जाऊन काय चूक केलीय ते सांगा, आम्ही सगळे चुकीचेच आणि बाकी सगळे बरोबर का? पूर्वीचा रेकॉर्ड काढा आणि काय घडलं, कसं घडलं ते समजेल, असा थेट इशारा अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी फुटीवर भाष्य करताना दिलाय. अजित पवार कोपरगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी दोन दिवसांपूर्वीच कोपरगाव येथे झालेल्या शरद पवारांच्या सभेवर निशाणा साधलाय.
अजितदादांचा पूर्वीचा रेकॉर्ड काढण्याचा इशारा : दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची कोपरगाव येथे उमेदवार संदीप वर्पे यांच्या प्रचारासाठी सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष फुटीवर बोलताना अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळेंना लक्ष्य केलं होतं. यावर बोलताना अजित पवारांनी पूर्वीचा रेकॉर्ड काढण्याचा इशारा दिलाय. लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट पैसे 1 ऑक्टोबरपासून दिले गेलेत. तसेच गायीच्या दुधाला 7 रुपये अनुदान मिळालंय. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे देत असल्यामुळे पारदर्शकता आहे. तसेच यात गळती नसल्याची माहिती अजित पवारांनी दिली. साडेबारा टक्के जागा आदिवासी समाजाला दिल्यात, तर मुस्लिम समाजाला 10 टक्के जागा दिल्यात. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जात असून, भेदभाव करीत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेने जात असल्याचे अजित पवार म्हणालेत.
अजित पवारांना मोठं पद मिळणार : तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा मांडला. शहराचा पाणी प्रश्न निळवंडे, पालखेड, गोदावरी कालवे या पाण्याच्या अडचणी सांगून पाणी, कालवे, रस्ते, शासकीय इमारती, भूमिगत गटारी, वीज प्रश्न सोडविल्याबद्दल आशुतोष काळेंनी अजित पवारांचे मतदारांच्या वतीने आभार मानले. येत्या काळात युतीचे सरकार येऊन आपल्याला मोठे पद मिळणार असल्याने आम्ही मांडलेले प्रश्न आपण सोडवाल, याबद्दल वाद नाही, असंही काळे अजित पवारांना उद्देशून म्हणालेत. महायुतीचे नेते असतील, मग माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे असो किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेला नाही. त्यांनी या निवडणुकीत मला पाठिंबा देण्याचे ठरवलंय, या सभेच्या निमित्ताने मी त्या सर्वांचे आभार मानतो, असे या वेळेस आशुतोष काळे यांनी जाहीरपणे सभेत सांगितले.
हेही वाचा-