पुणे- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गेल्या एक-दोन दिवसांपासून राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकाची जोरदार चर्चा सुरू असून, ज्यात धक्कादायक खुलासे करण्यात आलेत. त्यावरूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पुस्तकात अनेक धक्कादायक गोष्टी मांडण्यात आल्यात. पण मला वाईट याचं वाटतं आहे की, अदृश्य शक्ती पुरुष नव्हे तर महिलांच्या मागेदेखील लागते आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे याच अदृश्य शक्तीने माझ्या तीन बहिणींवर आयटीची रेड टाकली तेही एक, दोन दिवस नव्हे तर पाच दिवस ती रेड सुरू होती. यात रजनी इंदुलकर, निता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तिन्ही बहिणींच्या घरी अदृश्य शक्तीने छापा मारला आणि पाच दिवस तपास सुरू होता. पाच दिवस मोठा त्रास देण्यात आल्याचंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर असून, शिवाजीनगर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
चौकशी देवेंद्र फडणवीसांनीच लावली: त्या पुढे म्हणाल्या की, खरं तर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा आहे की, जेव्हा कैलासवासी आर. आर. पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले, तेव्हा त्या फायलीवर अंतिम चौकशी कोणी लावली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी लावली होती. ते मुख्यमंत्री असताना त्यांची त्यावर सही आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस यांनी जे विरोधात होते, त्या अजित पवार यांना बोलावून ती फाईल दाखवली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला दाखल व्हायला पाहिजे. त्यांनी आम्हाला नाही तर राज्याला फसवलंय. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना फाईल कशी दाखवली, याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
अदृश्य शक्तीकडून एजन्सीचा गैरवापर : राजदीप सरदेसाई यांनी एक पुस्तक लिहिलंय आणि त्यात मोठा दावा करण्यात आलाय. हा खूपच गंभीर विषय असून, याबाबत अनेक वेळा मी संसदेतदेखील बोललोय. अदृश्य शक्ती एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्षांचं घर फोडणं, अशा पद्धतीच्या असंवैधानिक गोष्टी करीत आहेत. विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी ईडी आणि सीबीआय याचा वापर करण्यात आला असून, विरोधी पक्षाच्या लोकांवर जे आरोप करण्यात आलेत, त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेऊन सत्ता स्थापन करण्यात आलीय, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय.
महिलांना यात का ओढत आहात: तसेच सुनेत्रा पवार यांच्या नावाबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, हेच तर दुर्दैवी आहे. सुनेत्रा पवार यांचा उल्लेख करण्याची काय गरज होती. तुमची लढाई आमच्याशी असताना तुम्ही आमच्या महिलांना यात का ओढत आहात, त्यांच्यावर का आरोप करीत आहात. आमची लढाई ही स्वाभिमानाची लढाई आहे, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचा -