अमरावती Riddhapur village history : बाराव्या शतकात यादव घराण्याचे राज्य असताना महाराष्ट्रात जाती निरपेक्षता आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या महानुभाव पंथाची स्थापना श्री चक्रधर स्वामी यांनी केली. 'महानुभाव पंथाची काशी' अशी ओळख असणारे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणारे रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांसाठी अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र स्थान आहे. याच ठिकाणी मराठीतील पहिला गद्यग्रंथ 'लीळाचरित्र' रचण्यात आला. त्यात सुमारे 200 लहान-मोठी मंदिर असणाऱ्या रिद्धपूर परिसरात ऐतिहासिक अशा नऊ विहिरी आहेत. या प्रत्येक विहिरींचं आपलं खास महत्त्व आहे. या ऐतिहासिक विहिरींचं विशेष जतन करण्यात आलंय.
मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ : संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरी' पूर्वीच इसवी सन 1278 मध्ये म्हाइं भट्ट यांनी 'लीळाचरित्र' हा मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ रिद्धपूर ते चांदुर बाजार मार्गावर काशी नदी ओलांडताच डाव्या बाजूला असणाऱ्या प्रसन्न ठिकाणी बसून लिहिला. म्हाइं भट्ट हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील सराळे या गावचे रहिवासी होते. गणपती आपय नावाच्या विद्वान पंडिताजवळ त्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला. डोंबे ह्या गावात श्री चक्रधर स्वामी यांची पहिल्यांदाच म्हाइं भट्ट यांच्याबरोबर भेट झाली. चक्रधर स्वामींच्या विचारांनी प्रेरित होऊन म्हाइं भट्ट यांनी त्यांच्या विचारांचं आयुष्यभर अनुसरण केलं. त्यानंतर आपलं गाव सोडून ते रिद्धपूरला आले.
चक्रधर स्वामींच्या आठवणीवर लिहिला ग्रंथ : श्री. चक्रधर स्वामी यांनी उत्तरागमन केल्यावर त्यांची महाराष्ट्रभरातील सर्व शिष्य मंडळी 1274 मध्ये रिद्धपूरला आली, स्वामींच्या चरित्राचं स्मरण व्हावं या विचारानं सर्व भक्त परिवारानं एकत्रित येऊन श्री. चक्रधर स्वामींवर ग्रंथ रचला जावा असा विचार मांडला. या विचारातूनच ही संपूर्ण जबाबदारी म्हाइं भट्ट यांच्यावर सोपविण्यात आली. म्हाइं भट्ट यांनी श्री चक्रधर स्वामींच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केल्यावर 1278 मध्ये 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला पद्यग्रंथ रचला. ग्रंथाची निर्मिती झालेल्या ठिकाणी आज पाच मंदिरं अस्तित्वात आहे.
असा आहे महानुभाव पंथ : "प्राचीन काळापासून दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रभाव होता. यानंतर जैन धर्म आणि वीरशैव तसंच नाथ संप्रदायदेखील आपले कार्य करीत होते. अकराव्या शतकापासून बौद्ध धर्माचा प्रभाव कमी व्हायला लागल्यावर वैदिक आचारधर्म समाज जीवनावर प्रभावी होऊ लागला होता. महाराष्ट्रात ही अशी परिस्थिती असताना उत्तर भारतात मुस्लिम राजवटींनी आपली पकड मजबूत केली होती. महाराष्ट्रात यादवांचे राज्य असताना दक्षिणेत लिंगायत पंथाचा उगम होऊन महाराष्ट्रात त्याचा प्रवेश सुरू झाला होता. वारकऱ्यांची विठ्ठल भक्तीदेखील महाराष्ट्रात होती. नाथ योगीदेखील आपल्या मतांचा प्रचार करीत होते. महाराष्ट्रात एकूणच धार्मिक वातावरण असं असताना श्री चक्रधर स्वामींनी बारावी शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथानं जाती निरपेक्षता आणि अहिंसेवर भर दिला. विशेष म्हणजे मराठी भाषेला महानुभाव पंथानं महत्त्व दिले. महाराष्ट्रात महानुभाव या नावाने ओळखला जाणारा हा पंथ उत्तरेकडे थेट दिल्ली आणि पंजाबपर्यंत 'जय कृष्णजी पंथ' या नावानं ओळखला जातो," अशी माहिती महानुभाव पंथाचे अभ्यासक प्रा. डॉ. केशव गाडबैल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पाच पंचकृष्णांना मान : महानुभाव पंथामध्ये पाच अवतारांना अतिशय मान दिला जातो, त्यांना 'पंचकृष्ण' असं संबोधलं जातं. या सगळ्यांनीच सामाजिक हिताचं कार्य केलंय. यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू, श्रीकृष्णचक्रवर्ती, श्रीचक्रपाणी राऊळ, श्रीगोविंदप्रभु असे हे महानुभावांचे पंचकृष्ण आहेत.
अशा आहेत ऐतिहासिक नऊ विहिरी : रिद्धपूर येथे सासु सुनेची विहीर, मातंग विहीर, दगडा दगडांची चळ ठेवून तयार करण्यात आलेली उतरंड विहीर, राम-लक्ष्मण विहीर, सुतक विहीर, आणि पूर्वी कापुरासारखा वास पाण्याला येत असणारी कापूर विहीर अशा नऊ विहिरी आहेत. सासु सुनेची विहीर आणि मातंग विहीर या दोन विहिरी अतिशय प्रसिद्ध आहेत. रिद्धपूर येथील प्रतिष्ठित नागरिक केशव नायक यांनी गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी श्रीगोविंदप्रभू यांच्या मार्गदर्शनात विहीर खोदली होती. केशव नायक यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आणि सुनेनं या विहिरीचं बांधकाम पूर्ण केलं. यामुळं या विहिरीला सासु सुनेची विहीर असं म्हणतात. काहींच्या मते सासु सुनेचं पटत नसल्यामुळं या विहिरीतून पाणी काढण्यासाठी सासूसाठी वेगळी व्यवस्था आणि सुनेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलीय. त्यामुळं याला सासू सुनेची विहीर म्हणतात, असे सांगितलं जातं.
मातंग विहिरीमागे काय आहे कथा?पूर्वी गावात मातंग समाजातील व्यक्तींना पिण्याचं पाणी विहिरीतून घेण्यास विरोध केला जायचा. यामुळं श्री गोविंद प्रभूंनी विहीर खोदली. या विहिरीला भरपूर पाणी लागलं. ही विहीर मातंग समाजासाठी असल्याचं श्री गोविंद प्रभूंनी स्पष्ट केलं. त्यामुळे या विहिरीला 'मातंग विहीर' असं संबोधलं जातं. अमरावती नरखेड रेल्वे मार्गासाठी ही मातंग विहीर तोडण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, यासाठी मोठे आंदोलन झालं. या विहिरीला धक्का न लागता या ठिकाणावरून रेल्वेचा रूळ टाकण्यात आला. या घटनेमुळं देखील मातंग विहीर प्रसिद्धीच्या झोतात आली.
राणी हरकूबाई होळकर यांचे श्रद्धास्थान : इंदोरचे राजे मल्हारराव होळकर यांच्यानुसार राणी हारकुबाई होळकर या महानुभव पंथाच्या अनुयायी होत्या. रिद्धपूर येथील श्री गोविंद प्रभू यांच्या राजमठ या ठिकाणी त्या हत्ती, घोडे आणि लवाजम्यासह अशा मोठ्या थाटात येत असत. त्यांनी रिद्धपूरच्या विकासासाठी भरभरून मदत केल्याची माहिती रिद्धपूर येथील श्री गोपीनाथ मठाचे श्री प्रसन्न शास्त्री यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -