पुणे Lok Sabha Election : दोन दिवसांपूर्वी राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. पुण्यासह राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात मतदान झालं. पुणे लोकसभा मतदार संघात 11 लाख 3 हजार 678 पुणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांचं भावी खासदार म्हणून बॅनर पुण्यात दिसून आलं होतं. त्यानंतर आज पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं भावी खासदार म्हणून बॅनर झळकलंय. काँग्रेस पक्षाचे युवक सरचिटणीस अमित बागुल मित्र परिवाराच्या हे बॅनर लावलंय. मात्र, या पोस्टरमध्ये मवाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघिरे यांचं पोस्टर लावण्यात न आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
महाविका आघाडीची बॅनरबाजी : पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपा मुरलीधर मोहोळ यांचं भावी खासदार म्हणून बॅनर लावलं होतं. त्यानंतर आज अमित बागुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे यांचं बॅनर लावलं आहे. निकाल लागण्याआधीच भाजपासह महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचं दिसत आहे. मतदारांनी निर्धार करून मारला शिका, खासदार आमचा झाला पक्का, असा उल्लेख बॅनरवर करण्यात आल्यानं पुणेकरांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
4 जून रोजी निकाल जाहीर : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे, मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीसह भाजपानं पुण्यात विजयाचा दावा केलाय. पुणे लोकसभा मतदार संघात एकूण टक्केवारी 53.54 टक्के मतदान झालं आहे. यात सर्वात जास्त मतदान वडगाव शेरी मतदार संघात झालं आहे. याच मतदार संघातून ज्या उमेदवाराला लीड मिळणार, तोच उमेदवार विजयी होणार असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये आहे.
पुण्यात तिरंगी लढत : पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून वसंत मोरे वंचित यांच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. मात्र मुख्य लढत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तसंच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना 55 ते 60 दिवस प्रचार करायला मिळाले होते. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी पुण्यात सभा घेतल्या होत्या.
हे वाचलंत का :
- महायुतीच्या उमेदवारांकरिता पंतप्रधान मोदी आज नाशिकसह कल्याणमध्ये घेणार सभा, मुंबईत करणार रोड शो - PM Modi Maharashtra visit
- मराठ्यांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा मैदानात उतरणार...; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार - Maratha Reservation
- अदानीचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांची पार्टनरशिप का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Wadettiwar On Ghatkopar Accident