नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो. या काळात देशभरातून हजारो साधू, महंत तसेच कोट्यवधी भाविक येत असतात. त्यामुळे प्राचीन व धार्मिक नाशिकचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणी नाशिकच्या महंतांनी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप भाजपाकडून कुठलंच स्पष्टीकरण आलं नाही. अशातच नाशिक लोकसभा निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावण्यासाठी तीन महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे.
कोण तीन महाराज निवडणुकीसाठी आहेत इच्छुक?
- जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितलं. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन लाखाहून अधिक आहे.
- स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. त्यांनी नाशिकमध्ये 2005 मध्ये श्रीकृष्ण आरोग्य संस्था सुरू केली. त्या माध्यमातून सेवाकार्य करीत आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीप्रमाणं नाशिक तीर्थक्षेत्रमधून लोकसभा निवडणूक लढवली, तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरेल यामुळं रखडलेली कामं मार्गी लागतील. नाशिकचा 'मंत्रभूमी ते यंत्रभूमी' हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, अशी इच्छा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मान्य न केल्यास नाशिकच्या धार्मिक, अध्यात्मिक विकास व पर्यटन वाढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यास आपण नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करु, असं मत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.
राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी साधू महाराजांची गरज : बाबाजी परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज म्हणाले,"सध्याचं राजकारण पाहता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी देणं गरजेचं झाले आहे. या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती फायदेशीर आहे. तिचं अनुकरण परदेशातील नागरिक कुतुहलाने करत आहे. हे काही वर्षांपासून आपण पाहत आहोत. येत्या काही दिवसांत 2024 ची निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. राजकीय नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत." पुढे प्रवक्ते विष्णू महाराज म्हणाले," आजचं राजकारण कंटाळवाणं वाटत असताना राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या झालेल्या बैठकीत निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री.श्री.1008महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे."
तर संधीचं सोनं करू : "नाशिक शहर हे संपूर्ण जगात 'कुंभनगरी' म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच प्रभू रामचंद्रांचा वास्तव्य इथं होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला त्र्यंबकेश्वर, हनुमान जन्मभूमी अंजनेरी, निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी अशा अनेक धार्मिक स्थळांचा नाशिकला इतिहास आहे. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच आम्ही याचं सोनं करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर या ठिकाणी देखील साधू महंतांना लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यास संधी मिळावी", अशी अपेक्षा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :