यवतमाळ Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. याच पार्श्वभूमीवर सर्व मतदारसंघातील उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना मंगळवारी (2 एप्रिल) अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी चक्क 12,500 रुपयांची डिपॉझिट म्हणून चिल्लर नामनिर्देशन पत्राबरोबर निवडणूक आयोगाकडं भरली आहे. मात्र, यावेळी पैसे मोजता-मोजता कर्मचाऱ्यांना घाम फुटल्याचं चित्र बघायला मिळालं.
पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक : मनोज गेडाम यांनी 12 हजार 500 रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडं सुपूर्द केली होती. हे पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं गेडाम यांनी स्वतः ही रक्कम मोजून निवडणूक विभागाकडं सादर करावी, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही सर्व नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यांमध्ये बांधून निवडणूक आयोगाकडं सुपूर्द केली.
काय म्हणाले मनोज गेडाम : सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या मनोज गेडाम यांना स्थानिक लोक गुरुदेव या टोपण नावानं ओळखतात. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना गेडाम म्हणाले की, "मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलोय, आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभं राहण्यासाठी एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे. त्यामुळंच सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. मी ही लोकसभा निवडणूक जिंकणारच", असा विश्वासही यावेळी अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- 'वंचित'चा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न! पुण्यातून वसंत मोरे उमेदवार? प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट - Third Alliance in Maharashtra
- पक्षांतर्गत नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली? शिंदे गटाला अपेक्षित जागा नाहीच? - Lok Sabha Election 2024
- महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात; चार एप्रिलला भरणार अर्ज - lok Sabha Elections