अमरावती Amravati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा शुक्रवारी (26 एप्रिल) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुलभपणे राबविता यावी, यासाठी गुरुवारी (25 एप्रिल) सकाळी अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रासह अचलपूर, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या विधानसभा मतदान क्षेत्रातील एकूण 2536 मतदान केंद्रांवर मतदान पथक रवाना झालेत. तर मेळघाटातील अति दुर्गम अशा 136 मतदान केंद्रांवर मतदान पथक मतदान साहित्यांसह बुधवारीच रवाना झाले आहेत.
परिवहन महामंडळाच्या 227 गाड्या : अमरावती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदान पथकांसह निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण 227 गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय. बडनेरा विधानसभा मतदारसंघात 46 बस, तर अमरावती विधानसभा मतदारसंघात 33, तिवसा मतदार संघात 37, दर्यापूर मतदार संघात 44, अचलपूर मतदारसंघात 29 आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात एकूण 35 राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पोलींग पार्ट्यांना घेऊन रवाना झाल्या आहेत. यासह एकूण 22 ट्रक 84 जीप आणि 20 मिनीबस यांची देखील व्यवस्था करण्यात आलीय. मेळघाटातील अतिदुर्गम गावांमध्ये पोहोचण्यासाठी 60 क्रुझर गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय.
1983 मतदान केंद्रावर होणार मतदान : अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी एकूण 1983 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी बडनेरा विधानसभा मतदारसंघात 337 मतदान केंद्र असून अमरावती विधानसभा मतदारसंघात 322, तिवसामध्ये 319, दर्यापूर मध्ये 342, मेळघाटात 354 आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात 309 मतदान केंद्र आहेत.
मतदान केंद्रावर असणार 'या' सुविधा : मतदान केंद्रांवर सावली मंडप, प्रतीक्षा कक्ष, यासह अपंगांसाठी व्हील चेअर, मतदार मदत कक्ष ,रांग विरहित मतदानाची सोय, वैद्यकीय पथक अशी सुविधा राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली. मतदानाच्या दिवशी सर्व गावांमधील आठवडी बाजार बंद राहणार असून प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खासगी क्षेत्रातील सर्व कामगारांना देखील पगारी सुट्टी देणे, खासगी संचालकांना बंधनकारक असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
पिली गावात सर्वात कमी मतदार : मेळघाटात चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या पिली या गावात सर्वात कमी म्हणजे केवळ सात मतदार आहेत. या सात मतदारांना मतदानाची सुविधा पिली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त मतदारांची संख्या अमरावती शहरातील नवसारी परिसरातील महापालिकेच्या पूर्व माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर आहे. या ठिकाणी एकूण 1535 मतदार आहेत.
प्रशासनाकडून मतदान करण्याचं आवाहन : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं सर्व सुविधा करण्यात आली आहे. तर अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात मतदारांनी मतदानासाठी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर यावं असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलंय.
हेही वाचा -
- अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu
- अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल - Amravati Lok Sabha Election 2024
- "अमरावतीकरांनो माफ करा, पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली", असं का म्हणाले शरद पवार? - Sharad Pawar