अकोला VBA Against Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही घोषित होऊ शकतात. मात्र, अजूनही महाविकास आघाडीचा जागावाटपा संदर्भातील तिढा सुटलेला नाही. अशातच अकोला शहरात महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीनं ‘होर्डिंग्ज वॉर’च्या माध्यमातून डिवचल्याचा प्रकार समोर आलाय. महाविकास आघाडीत सामावून नं घेण्याच्या संदर्भात वंचितनं शहरात होर्डिंग्ज लावून मविआलाच प्रश्न केले आहे. तसंच यामुळं आता वंचित बहुजन आघाडी वेगळी लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वंचितमध्ये नाराजी : महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये बैठका सुरू आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये अजूनही समाविष्ट करण्यात आलेलं नाही. तसंच वंचितनं दिलेल्या प्रस्तावावर देखील अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळं वंचितमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी खुद्द वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांकडूनही व्यक्त होत असली तरी मात्र, यासंदर्भात ते अद्याप विशेष असं काही बोललेले नाही. मात्र, त्यांनी आपल्या बोलण्यातून बऱ्याचवेळा यासंदर्भात सूचक वक्तव्य केले असल्याचं दिसतं. याच पाश्वभूमीवर आता वंचितनं ‘होर्डिंग्ज वॉर’सुरू केला आहे.
होर्डिंग्जमध्ये काय म्हटलंय? : अकोल्यात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जमध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. तर 2 ते 27 फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवल? याचं उत्तर द्या. वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातुन प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे? महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या 2 जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष गेल्या 15-20 वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत. त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय? या आशयाचे प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत.
हेही वाचा-