मुंबई Prakash Ambedkar Play Mind Game ? : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर आता जागा वाटपाच्या अंतिम चर्चेला वेग आला आहे. एकीकडं महाविकास आघाडीतील सर्व नेते आम्ही 'वंचित'ला जागा सोडण्यास तयार आहोत, असे सांगत आहेत. दुसरीकडं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर मात्र अजूनही "तुम्ही तुमचं ठरवून घ्या," या भूमिकेवर ठाम आहेत. 'वंचित'ला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही असताना 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नेमका काय माइंड गेम सुरू केला आहे, याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.
महाविकास आघाडी आणि महायुती जोरदार टक्कर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार टक्कर होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. महायुतीच्या वतीनं राज्यात जोरदार प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरू झाला आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार की नाही, याची अद्याप शाश्वती नाही.
प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडी बरोबर माईंड गेम : महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी वंचित महाविकास आघाडी सातत्यानं आग्रही असल्याचं वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. मात्र, दुसरीकडं प्रकाश आंबेडकर हे वेगळ्या भूमिकेत सातत्यानं दिसतात. "अद्यापही महाविकास आघाडीचे स्वतःचे ठरले नाही, त्यांनी आधी स्वतःचं ठरवून घ्यावं," असं सांगत अद्यापही आपण महाविकास आघाडीत समाविष्ट नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे "पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर माईंड गेम खेळत आहेत," अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. "प्रकाश आंबेडकर हे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीला जागा वाटपाबाबत खेळवतील. कदाचित शेवटी महाविकास आघाडी बरोबर जमत नाही, असं सांगत पुन्हा एकदा एकला चलोचा नारा देतील आणि त्यामुळे पुन्हा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे," असंही आनंद गायकवाड यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर शेवटच्या क्षणी दगा देतील : यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नेहमीच संशयास्पद ठरली आहे. गेल्या वेळी सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत चर्चा केली, मात्र ते सोबत गेले नाहीत. ते आताही त्याच पद्धतीनं वागत आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत माईंडगेम खेळत आहेत हे नक्की. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जातील, याची खात्री नाही. ते शेवटच्या क्षणी दगा देतील," असंही जोशी यांचं म्हणणं आहे.
काय आहे आंबेडकरांची भूमिका? : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीबरोबर आमची बोलणी सुरू आहे. मात्र माझ्या माहितीप्रमाणं अद्याप त्यांचाच जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही, तर ते माझ्याशी काय चर्चा करणार? आणि मी तरी कोणत्या पक्षाशी चर्चा करणार? महाविकास आघाडीमध्ये शिवसेना 22 काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा लढवण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यात अजून पंधरा जागांबाबत तिढा कायम आहे. तो तिढा सुटल्यानंतर आमच्या पाच जागांबाबत चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे जोपर्यंत ठरत नाही, तोपर्यंत आमचं काही स्पष्ट नाही," असे संकेत पुन्हा एकदा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत.
संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना 'शाल जोडा' : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांचे पत्र आपण वाचायचं असतं. ते उत्तम वक्ते आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम लेखक होते. पत्रकार होते. उत्तम पत्रलेखक होते. त्यांचा वारसा प्रकाश आंबेडकर लिखाणामध्ये चालवत असतील, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे," अशी कोपरखळी राऊत यांनी लगावली. "मात्र, त्यांची भूमिका आम्हाला संशयास्पद वाटत नाही. आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आमचा मायावतींवर विश्वास नाही. त्या भाजपाला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहेत. मायावतींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्या दबल्या गेलेल्या आहेत. पण, प्रकाश आंबेडकरांचं तसं नाही. ते महाराष्ट्रातल्या मातीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. पंतप्रधान मोदींची हुकूमशाही गाडण्यासाठी आमच्या सोबत ते उभे राहतील. भाजपाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची मदत त्यांच्याकडून होणार नाही" असंही राऊत म्हणाले.
थोरात यांनीही घेतली भेट : दरम्यान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते बैठकीसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे अजूनही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही गुलदस्त्यातच आहे.
हेही वाचा :