मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश करेल, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहेत. मात्र, अशा पद्धतीचा चर्चेला काहीही अर्थ नाही. आपलं कुणाशीही बोलणं झालं नाही. भेटही झालेली नाही. भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला कोणतीही ऑफर नाही, असा स्पष्ट निर्वाळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत दिला.
प्रतीक पाटलांबाबत विचार सुरू : माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सांगली किंवा हातकणंगले या मतदारसंघांमधून लोकसभेसाठी उमेदवारी देता येईल का? याची चाचणी पक्षाकडून सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितलं. हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. कारण त्यांचे आमच्या पक्षाशी कोणतीही चर्चा नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी त्यांची काही प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.
मला भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. मी कुठेही जात नाही. आमचे आमदारही सर्व सोबत आहेत. तेही कुठे जात नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही- जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
वंचित सोबत चर्चा सुरू : "आगामी निवडणुकांच्या संदर्भात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. चर्चाही झाली आहे. येत्या आठ दिवसांत आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. तसंच, वंचित बहुजन आघाडी सोबत म्हणजेच आंबेडकर यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाली आहे," असं पाटील यांनी सांगितलं. "रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. त्या ठिकाणी नवीन पर्याय आम्ही देत आहोत. मात्र, त्यासाठी अद्याप शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा झाली नाही," असंही त्यांनी सांगितलं.
दिल्लीतही भेट नाही : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीत न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही आपण महाराष्ट्रातच आहोत. त्यामुळे दिल्लीतही कोणाशी भेट घेण्याचा प्रश्न नाही. असं स्पष्ट करीत जयंत पाटील यांनी पक्षांतराच्या सुरू असलेल्या चर्चांना विराम दिलाय. मराठा आरक्षणासंदर्भात सभागृहातील सर्वांना बोलायची इच्छा निश्चित असते. परंतु वेळेअभावी सर्वांना बोलता येणार नाही. गटनेत्यांना बोलण्याची संधी मिळेल त्याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होईल. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे विधेयक मांडले जाणार आहे, त्या संदर्भात कमी वेळेत जास्त भूमिका मांडल्या जातील, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
2 उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर पिता-पुत्राचा सामना रंगण्याची शक्यता
3 शिरुरची जागा कुणाची? अमोल कोल्हे यांचं आढळराव पाटलांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?