चंद्रपूर Shivani Wadettiwar : चंद्रपूर लोकसभेवर शिवानी वडेट्टीवार यांनी आपला दावा सांगितलाय. यासाठी त्यांनी दिल्ली देखील गाठली. मात्र, शिवानी यांना स्थानिक पातळीवरूनच विरोध होतो आहे. आम आदमी पक्षानं यापूर्वीच काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी नकोच असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीत सामील घटक पक्षांनी लोकसभेसाठी पार्सल उमेदवार नको, तो स्थानिकच हवा अशी आग्रही भूमिका घेतली आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत याबाबतची भूमिका जाहीर करण्यात आली. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वडेट्टीवार-धानोरकरांमधील वाद सर्वश्रुत : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्याप काँग्रेसकडून जाहीर झालेली नाही. हे तिकीट दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळणार अशी चर्चा होती. अशातच राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी या मतदार संघावर दावेदारी सांगितली. आपण मागील सात वर्षांपासून युवक काँग्रेसचे काम करीत असून युवा नेतृत्व म्हणून आपल्याला संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांची आहे. या मागणीला विजय वडेट्टीवार यांचा भक्कम पाठिंबा आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर यांचा पक्षांतर्गत वाद हा सर्वश्रुत होता. ही दुही दिवसेंदिवस वाढत होती. मात्र, मे 2023 ला खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर देखील इथे पोटनिवडणूक घेण्यात आली नाही.
काँग्रेसची अंतर्गत धुसफूस समोर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरची जागा ही बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळण्याची चर्चा होती. आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले; मात्र यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी या जागेवर दावेदारी सांगितली. याच दरम्यान त्यांनी गाठीभेटी देखील सुरू केल्या; मात्र यामुळे काँग्रेसची अंतर्गत धुसफूस समोर आली. शिवानी यांनी तिकीट मिळण्यासाठी दिल्ली गाठली. तर आज झालेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत जिल्ह्याबाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊ नये केवळ स्थानिकाला प्राधान्य द्यावे, असा एकमताने ठराव पारित केला.
शिवानीच्या नावाला स्थानिक संघटनांचा विरोध : यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, माजी नगरसेवक दीपक जयस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सोयल शेख, संभाजी बिग्रेडचे शहर अध्यक्ष विनोद थेरे उपस्थित होते. शिवानी यांच्या विरोधात ही थेट घेराबंदी आहे. कारण शिवानी ह्या नागपुरात राहतात. स्थानिक मुद्दा घेऊन त्यांचा विरोध केला जाऊ शकतो. त्यांच्या नावाबाबत स्थानिक संघटन फारसे अनुकूल नाही असेच दिसून येत आहे. याबाबतचे पत्र सर्व पक्षांच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा :
- Shirdi Saibaba Sansthan : शिर्डी साई मंदिरात उन्हापासून भाविकांचं होणार संरक्षण; साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात 'ही' सोय
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल
- जागावाटपाचा अजित पवारांना बसणार पहिला धक्का...आमदार निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश?