शिर्डी Vijay Wadettiwar : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणाविरोधात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाना साधला आहे. ते आज शिर्डीत बोलत होते.
काय म्हणाले वडेट्टीवार? : "राज्यातील सलोखा बिघडवून समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम महायुती सरकार करत आहे. सत्तेच्या लालसेपोटी महायुती सरकारनं समाजाला आरक्षणाची लालुच दिली आहे. आता सरकार समाजाला उद्ध्वस्त करत आहे. आरक्षणामुळं दोन समाजात तेड निर्माण होत आहे", असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
'ते' भुईसपाट होतील : "ओबीसींना संविधानानं दिलेलं आरक्षणाचं संरक्षण करण्याची मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, महायुती सरकारनं महाराष्ट्रात आरक्षणामुळं आग लावलीय. मराठ्यांसह ओबीसींना फिरवण्याचं काम सरकार करत आहे. त्यांच्या या राजकारणामुळं ते भुईसपाट होतील" असा टोला वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे.
SIT स्थापन करून चौकशी करा : "लोकांचे पक्ष फोडण्याचं काम, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे सोडून यांना काहीच कळत नाही. नीट परीक्षेत देशभरात गोंधळ झालाय. 'नेट'ची परीक्षा रद्द करावी लागली आहे. सरकारला पेपर फुटीच्या मुळापर्यंत का जाता येत नाहीय. उद्या भलतेच MBBS झाले, तर भविष्यात काय होईल?. नीट तसंच नेट परीक्षांबाबत सरकारनं जबाबदारी घ्याला हवी. या संदर्भात SIT स्थापन करून सरकारनं सखोल चौकशी करावी," अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
'हे' वाचलंत का :
- रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये, थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस - Ravindra Waikar
- बिहारमध्ये ६५ टक्के आरक्षण देणारा कायदा रद्द, नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाचा झटका - Bihar reservation Law
- भाजपाविरोधात 21 जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन; नाना पटोले यांची घोषणा - Nana Patole On BJP