मुंबई Lata Deenanath Mangeshkar Award : संगीत रंगभूमीवर इतिहास रचणारे ज्येष्ठ गायक कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या 34 वर्षांत संगीत, नाट्य, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आदी प्रांतातल्या 212 दिग्गजांना पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सन 2022 पासून 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. विश्वस्त मंडळ म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या मुंबईतील 'प्रभूकुंज' या निवासस्थानी यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे आजवरचे मानकरी: दरवर्षी मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचं वितरण केलं जातं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या वर्षी 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचे मानकरी ठरले. तर दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 साली 'स्वराशा' आशा भोसले या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यावर्षी सर्वानुमते या प्रतिष्ठे्च्या पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाची निवड करण्यात आली. 24 एप्रिल 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर 24 एप्रिल 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता. आता यावर्षी 24 एप्रिल रोजी 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील योगदानासाठी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अमिताभ बच्चन यांच्यासह संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. तसंच 'गालिब' या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार, 'दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल' ला समाजसेवेसाठी आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार, प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी मंजिरी मराठे यांना 'वाग्विलासिनी पुरस्कार', अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य, चित्रपट सेवा), पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा) आणि रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार) यांची नावे यंदाच्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली.
लतादीदी-अमिताभ याचं वेगळं नातं : अमिताभ बच्चन यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अमिताभ बच्चन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन आणि दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं एक वेगळं नातं होतं. कारण अमिताभ यांच्या अनेक चित्रपटासाठी लतादीदींनी गाणी गायली आहेत. तसेच अमिताभ बच्चन हे लतादीदींचा आईप्रमाणं आदर करत. अमिताभ यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटातील गाणी लतादीदींनी गायली आहेत. सिनेसृष्टीतील अमिताभ बच्चन यांच्या योगदानासाठी यावर्षीचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' देण्यात येणार आहे.
श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी : या पुरस्कार सोहळ्याच्या जोडीला मुंबईतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात 'श्रीशारदा विश्वमोहिनी लतादीदी' ही सुरेल संगीत मैफलही रंगणार आहे. दिवंगत लता मंगेशकर यांच्या गानकर्तृत्वाला त्यांचे बंधू, ख्यातनाम संगीतकार, गायक पंडित ह्रदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमातून सांगीतिक मानवंदना देणार आहेत. अविनाश प्रभावळकर यांच्या 'ह्रदयेश आर्टस्' च्या वतीने संगीतरसिकांना हा सूर-तालाचा अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा -