मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी केला जाणार असून, त्याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं शव विच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर रुग्णालयात जात सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले अजित पवार? : 2004 ते 2008 या काळात बाबासाहेब यांनी विभागाचे मंत्रीपद भूषवलंय. सोबतच त्यांनी म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलंय. त्यांचे सामाजिक कार्य आणि राजकारणातील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात दफन विधी केले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुढं ते म्हणाले की, "काल घडलेली घटना, ती कशी घडली यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचं काम खूप चांगलं होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांची पथके वेगवेगळ्या राज्यात गेली आहेत. घटनेचा तपास सुरू आहे."
आरोपींना न्यायालयात हजर करणार : याबाबत अधिक माहिती अशी की, बाबा सिद्दीकी यांचे शव विच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्याचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. तर, दुसरीकडं ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देणार आहेत.
हेही वाचा -
- बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती, पोलिसांकडून तत्काळ सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
- घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय ते राष्ट्रवादीमधील वजनदार नेते; जाणून घ्या, बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास
- बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवुडमध्ये हळहळ; सलमान खान, शिल्पा शेट्टीसह 'हे' सेलिब्रिटी रुग्णालयात दाखल