नाशिक Lakshmi Tathe Arrested In Nashik : नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे (Lakshmi Tathe Arrested) यांना तेलंगणा पोलिसांकडून (Telangana Police) अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, तेलंगणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ताठे यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकानं केली कारवाई : तेलंगणामध्ये 8 जून 2024 ला 190 किलोंचा गांजा पकडण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी कारवाई केली. तसंच या प्रकरणात अहमदनगर आणि बीडमधील दोन गांजा तस्करांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणी करण्यात आलेल्या अधिक तपासादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंचं नाव पुढं आल्यानं 1 महिन्यानंतर तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे आणि त्यांचा मुलगा विकास ताठे या दोघांना अटक केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचं स्पष्टीकरण : लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. "लक्ष्मी ताठेंची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेनेचा (शिंदे गट) आणि त्यांचा काहीही संबंध नाही," असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलंय.
तस्करी प्रकरणी यापूर्वीही अटक : यापूर्वी 2018, 2019 मध्ये नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी गांजा तस्करी प्रकरणी लक्ष्मी ताठे आणि अन्य संशयितांना अटक केली होती. 2018 ला औरंगाबादरोडवरील (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) एका संशयास्पद गोदामावर छापा टाकून नाशिकच्या गुन्हे शाखेनं 34 लाख 50 हजार रुपये किमतीचा 690 किलो गांजा हस्तगत केला. सदरील गोदाम हे लक्ष्मी ताठे यांच्या मालकीचं असल्याचं निष्पन्न झालं. यावेळी लक्ष्मी ताठे, त्यांचे जावई संशयित सुमित बोराळे आणि त्याचा साथीदार सुरेश महाले यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा -