मुंबई Ad Dr Kshitija Wadatkar Wankhede : कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानं अॅड. डॉ. क्षितिजा वडतकर-वानखेडे यांना जगप्रसिद्ध फोर्ब्स यादीच मानाचं स्थान मिळालं आहे. उत्कृष्ट वकील आणि उत्कृष्ट व्यवसाय संस्थापक अशा दोन्ही श्रेणीत बहुमान पटकाविणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. त्यांच्या यशाचं कौतुक सर्वत्र होत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नवी दिल्लीत एका सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी : अॅड. क्षितिजा यांना २००८ साली 'नागपूर विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी' म्हणून बहुमान मिळाला होता. २०२३ मध्ये भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिलांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्या आज आर्थिक गुन्हे क्षेत्रातील आघाडीच्या वकील म्हणून कार्यरत आहेत. तसंच एका प्रसिद्ध लॉ फर्मच्या संस्थापक आहेत. क्षितिजा यांचे वडील गुणवंत वडतकर आणि आई सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत.
शून्यातून उभं केलं विश्व : यश मिळवण्यासाठी परिश्रमाला पर्यायच नाही. मात्र, कठोर परिश्रम करताना योग्य दिशेनं काम करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "15 वर्षांपूर्वी मी मुंबईत आले. तेव्हा माझ्याकडे सुवर्णपदक, गुणवत्ता आणि नागपूर विद्यापीठाचा 'सर्वोत्तम विद्यार्थिनी' पुरस्कार हातात होता. ही पदकं माझ्या बॅगेत घेऊन मी मुंबईत पाऊल टाकलं. माझ्याकडे कुणाचीही शिफारस नव्हती. केवळ गुणवत्ता आणि ही पदकं हातात घेऊन मी शून्यापासून माझं स्वतःचं छोटसं जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला."
सामाजिक कर्तव्याकडेदेखील लक्ष द्यावे - "कायदा क्षेत्रात आपलं नाव कमवून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला होता. इतक्या वर्षांचं सातत्य, कष्ट, धडपडीतून शिकत माझा आजपर्यंतचा प्रवास झाला. मला मिळालेल्या यशामध्ये, सन्मानामध्ये आपले आई-वडील, पती, मुलगा यांचं मोठं योगदान आहे. नवोदित वकिलांनी यशासाठी परिश्रमासोबतच योग्य दिशेनं प्रयत्न करावेत. केवळ आर्थिक बाबींकडे लक्ष न देता सामाजिक कर्तव्याकडेदेखील लक्ष द्यावं,". यावेळी त्या पुढे म्हणाल्या, "सामाजिक जबाबदारी समजून काम केल्यास आयुष्यात समाधान मिळतं".
वकिली क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्य : वकिली क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी अॅड. क्षितिजा यांनी नेहमीच प्राधान्य दिलय. महिला आणि मानवी हक्कांसाठी त्या लढा देत आहेत. तळागाळातील महिला आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या वकिली क्षेत्रातील ज्ञानाचा नेहमीच त्यांनी वापर केला. महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या अनेक प्रकरणात त्या नाममात्र शुल्क आकारुन आपली सेवा देतात. अनेकदा तर विनामूल्य सेवा देतात.
- लहान शहरातून येणाऱ्या वकिलांना मदतीचा हात : लहान शहरातून मुंबईत येऊन वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांना आपल्या फर्मच्या माध्यमातून त्या संधी देतात. कर्मचारी म्हणून नव्हे तर उद्योजक म्हणून जडणघडण होईल, अशी वागणूक त्यांच्या फर्ममध्ये दिली जाते. आपल्याला मिळालेला सन्मान म्हणजे कष्टाचं चीज झाल्याचं समाधान देणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा
- नोकरी न मिळल्यामुळे निराश न होता सागरने दिला आपल्या कलेला वाव - Sagar Somvanshi artist
- दोन तरुणांची यशोगाथा, एकानं हॉटेलमध्ये तर दुसऱ्यानं हमालाचं काम करत मिळवली सरकारी नोकरी
- कौतुकास्पद! भाजीपाला पिकवत पठ्ठ्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरत केली ऑर्किड फुलांची शेती - Orchid Farming