कोल्हापूर Tractor Trolley Overturned Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट-बस्तवाड दरम्यान असलेल्या ओढ्यात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेलेले 8 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. यापैकी 5 जण पुराच्या पाण्यातून पोहत नदी काठी पोहोचले. तर दोघांचा अजूनही शोध सुरू आहे. अतिवाट गावचे सरपंच पती सुहास पाटील यांचा पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्घटना घडली आहे. 'एनडीआरएफ'च्या जवानांकडून बुडालेल्या दोघा जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.
ट्रॅक्टरचं चाक खड्ड्यात अडकलं : शिरोळ तालुक्यातील अकिवाट-बस्तवाड मार्गावर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेत सहा जण बचावले होते. यातील एक जण अत्यावस्थ परिस्थितीत असल्यानं त्यांना उपचारासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला. अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आणि अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण बेपत्ता आहेत.
खड्ड्यात चाक अडकलं, ट्रॅक्टर पलटी : ओढ्यावरून जाताना ट्रॅक्टरचं चाक खड्ड्यात अडकल्यानं ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरमधून उड्या टाकून या अपघातातून बचावलेले अकिवाट येथील श्रेणिक चौगुले, रोहीदास माने, खिद्रापूर येथील केळी व्यापारी अंगद मोहीते, अझहर आलासे, प्रदीप पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा होता. अपघातातून बचावलेल्यांना दत्तवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ घटनास्थळी : शिरोळ तालुक्यातील अकिवाट बस्तवडे ओढ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुहास पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तर उपचारासाठी दाखल केलेल्या अपघातग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ यांनी मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ 4 लाखांची मदत जाहीर केली.
हेही वाचा: