कोल्हापूर Silver Businessman Murder In Hupari : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा व्यापार करणाऱ्या 31 वर्षीय व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळं कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोन येथे आपल्या आई वडिलांसोबत ब्रह्मनाथ हालुंडे वास्तव्यास होता. 21 सप्टेंबर रोजी दुपारी घरी कोणीही नसल्याचं पाहून आरोपीनं घरात शिरून ब्रह्मनाथवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीनं तिजोरीतील सुमारे 15 लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. रविवारी सायंकाळी ब्रह्मनाथचे आई-वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तत्काळ हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निरीक्षक एन. आर. चौखडे. निरीक्षक पंकज गिरी, सपोनि दिगंबर गायकवाड, प्रसाद कोलपे, नितेश कांबळे, दर्शन धुळे यांच्यासह पोलीस पथक, ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. घरातील 15 लाखांचे दागिने गायब असल्यानं चोरीच्या उद्देशानं हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
- मृताचा धाकटा भाऊ पोलिसांच्या ताब्यात : ब्रह्मनाथला एक धाकटा भाऊ आणि बहीण असून दोघंही विवाहित आहेत. ब्रह्मनाथ आणि त्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद असल्यानं दोघं वेगळे राहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळं याप्रकरणी संशयित प्रवीण हालुंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा -