सातारा : महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षात कराड दक्षिणमध्ये कुठलंही विकासाचं काम झालं नाही. त्यात दोन वर्षे कोरोना महामारीला सामोरं जावं लागलं. त्या काळात राजकीय गट, तट, जात, पक्ष न पाहता आताच्या काँग्रेस पार्टीतील अर्धे नेते बरं करण्याचं काम कृष्णा हॉस्पिटलनंच केलं, असा टोला भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला.
शत्रूची सेवा करण्याचं भाग्य लाभलं : कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावात झालेल्या प्रचार शुभारंभाच्या सभेत बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले की, "कोरोना काळात काही हॉस्पिटल्समध्ये एक ते दीड लाख रूपये घेतले जात होते. काहीजण आपले दवाखाने बंद करून बाहेर गावी गेले. परंतु, आम्ही कोरोना काळातील काम हे राजकीय फायद्यासाठी केलं नाही. शत्रूची देखील सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. ती सेवा आम्ही काकणभर जास्तच केली."
कराड दक्षिणसाठी 1 हजार कोटींचा निधी आणला : कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. आम्ही जनतेच्या दारात जाऊन विकासाची अपेक्षा जाणून घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 745 कोटी, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 200 कोटी, असा 1 हजार कोटींचा निधी आणण्यात यश आलं, असं डॉ अतुल भोसले यांनी सांगितलं.
'लाडकी बहीण' योजना तुम्ही का नाही आणली? : डॉ. अतुल भोसले म्हणाले की, "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं आम्ही स्वागत केलं. पण, विद्यमान आमदारांनी हा 'चुनामी जुमला' असल्याची टीका केली. योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत का? राज्य दिवाळखोरीत निघेल. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही योजना आणल्याचं वक्तव्यही त्यांनी विधिमंडळात केलं. मग तुम्ही मुख्यमंत्री असताना ही योजना का आणली नाही?" असा सवालही त्यांनी केला.
झोपडपट्टी दिसू नये म्हणून घराची भिंत वाढवली : स्वतःच्या घरासमोरच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करता आलं का, असा सवाल डॉ. अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाणांना केला. "गेली पन्नास वर्षे म्हणजे तीन पिढ्या तुम्ही सत्तेत आहात. मग तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीला लागून असलेल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन का करता आलं नाही? झोपडपट्टी दिसू नये, म्हणून घरांची भिंत वाढवली. ज्या दिवशी सत्तेत संधी मिळेल, त्या दिवशी पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं पहिलं काम अजेंड्यावर आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
ना थकूंगा, ना झुकूंगा : "महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विकासाचं पर्व उभं राहिलंय. आपल्यावर कुणीही चिखलफेक केली तरी आपण त्यांना मतदानातूनच उत्तर द्यायचं आहे. कराड दक्षिणमध्ये महायुतीला विजयी करून कमळ फुलवायचंय. त्यासाठी मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर नेऊन मतदान घडवून आणा. काहीही झालं तरी 'ना थकूंगा, ना झुकूंगा, ना रुकूंगा, आपके लिये मै हाजीर हू'," असा शब्द डॉक्टर अतुल भोसले यांनी दिला.
हेही वाचा :