सातारा Unauthorized Constructions Mahabaleshwar : साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय. अत्यंत गुप्तता पाळत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज (10 मार्च) पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्यानं पाडण्यात आलं. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल आणि एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली होती.
नंदनवनला अनाधिकृत बांधकामांचा विळखा : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात विनापरवाना अनाधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. सध्याच्या घडीला सुमारे 120 बांधकामं अनाधिकृत आहेत. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले असून त्यानुसार महसूल विभाग, पोलीस, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासनानं अत्यंत गुप्तता पाळून रविवारी पहाटे मेटगुताड, गुरेघर येथील अनाधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली.
कारवाईच्या बडग्यामुळं व्यावसायिकांचे धाबे दणाणले : गुरेघर येथील डोंगर कड्यावर नव्यानं सुरु असलेले अंदाजे 5 हजार स्वेअर फुटचं बांधकाम प्रशासनानं जमीनदोस्त केलं. पहाटे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टरच्या साहाय्यानं प्रशासनानं ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळं महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणादणाले आहेत.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई : महाबळेश्वर येथील अनाधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी सातत्यानं होत होती. त्यानुसार प्रशासनानं धडक कारवाई करत बांधकामांवर हातोडा मारला. वाईचे प्रांताधिकारी राजेश जाधव, महाबळेश्वरच्या तहसिलदार तेजस्विनी पाटील, वाईच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पाचगणीचे मंडल अधिकारी चद्रकांत पारवे, महाबळेश्वरचे मंडल अधिकारी खटावकर, तसंच सर्व तलाठ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
हेही वाचा -
- illegal construction : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर भाजपचे रोहिदास मुंडे करणार उपोषण
- MNS On Mumbra Hill Construction: मुंब्रा डोंगरावरील 'त्या' अनधिकृत बांधकामांचे सर्व्हेक्षण करा; अन्यथा गणेश मंदिर...
- Goregaon Mulund road project : गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई