जालना- भोकरदन तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. कुंभारी गावातील वाडी परिसरामध्ये मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. समर्थ परशुराम तायडे, (वय ५ ,रा.आमठाणा, ता.सिल्लोड) असे चिमुकल्याचं नाव आहे.
जालना रोडवरील कुंभारी गावात एक वाडी आहे. या ठिकाणी गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला होता. कार्यक्रम आटोपून ४ मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र, त्यांचा मुलगा समर्थ हा इतर मुलांबरोबर खेळत असताना मोबाईलची खराब झालेली बॅटरी त्यानं कानाला लावली. त्याच क्षणी भयानक स्फोट होऊन समर्थच्या कानाला व हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्याला येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलीस ठाण्यात नोंद- चिमुकल्याच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भोकरदन पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. तायडे कुटुंबाची घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं समर्थ याचे वडील मोलमजुरी करतात. बालकाच्या मृत्यूच्या घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मोबाईल स्फोट होण्याची काय आहेत कारणे- तज्ज्ञांच्या मते स्मार्फफोनचा स्फोट होण्याची विविध कारणे आहे. मात्र, बहुतांश कारणे ही मोबाईलच्या बॅटरीशी संबंधित असतात. बॅटरी ही लिथियम आयर्न यांच्यापासून बनलेली असते. त्यात काही बिघाड झाला तर आतील घटकांची रचना बिघडून स्फोट होण्याची शक्यता असते. मोबाईलची बॅटरी जास्त प्रमाणात चार्जिंग केली तर स्फोट होण्याची दाट शक्यता असते. तसेच मोबाईलचे प्रोसेसर खूप वेगानं गरम होत असेल तर स्फोटाची शक्यता वाढते.
मोबाईल स्फोटपासून कसं संरक्षण करावे? खूप वेळ मोबाईल सुर्यप्रकाशात ठेवला तर बॅटरी तापून स्फोट होण्याची भीती असते. मोबाईल हा चार्जिंगला लावल्यानंतर शॉर्टसर्किट झाल्यानंतर स्फोट होण्यासारखी स्थिती निर्माण होते. मोबाईल खूपच गरम होत असेल तर सावध व्हा. ही मोबाईलमधील काहीतरी बिघाडाची लक्षणे आहेत. जर फोन अचानक बंद पडत असेल तर मोबाईल बॅटरीची समस्या असू शकते. अशा परिस्थितीत मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. लहान मुलांना मोबाईलपासून शक्यतो दूर ठेवा. मोबाईल हाताळताना बॅटरीची समस्या असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या. जुने खराब झालेले मोबाईल व बॅटरी हातात घेणं टाळावं, असा तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येतो.
हेही वाचा-