जालना Jalna Crime News : जालना तालुक्यातील देऊळगाव राजा रोडवर असलेल्या गोंदेगाव शिवारामध्ये आर्यन भातसोडे या अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानं त्याच्या वडिलांनी त्याचे परस्पर अंत्यसंस्कार केले. मात्र, मुलाच्या आईनं आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्यानं पुरलेला मृतदेह तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी तसंच पोलिसांच्या समक्ष बाहेर काढण्यात आलाय. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. तर मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदनानंतर समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलंय.
नेमकं काय आहे प्रकरण : जालना तालुक्यातील माळेगाव येथील रावसाहेब भाटसोडे आणि त्यांची पत्नी सिंधुबाई यांच्यामध्ये काही वर्षांपासून वाद सुरू असल्यानं ते दोघंही वेगवेगळे राहत होते. त्यांचा 11 वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याच्या आईसह चिखली तालुक्यातील अंत्री येथे राहात होता. काही दिवसांपूर्वी आर्यनचे वडील त्याला माळेगाव येथे घेऊन आले होते. मात्र, त्यानंतर 30 मार्चला सिंधुबाई यांना आर्यनचा अपघात झालाय असं फोनवर कळवण्यात आलं. त्या माळेगावमध्ये आल्या तेव्हा आर्यनचा मृत्यू झाला होता. मात्र, तेव्हा सिंधुबाई यांना आर्यनच्या गळ्याभोवती खुणा असल्याचं आणि त्याचा अंगावरील शिरा निळ्या पडल्याचं आढळून आलं. मात्र, त्यानंतर पोलिसांना खबर करण्यापूर्वीच मुलाच्या वडिलांनी त्याचे अंत्यसंस्कार केले.
मृतदेह पुन्हा काढला बाहेर : सिंधुबाई यांना आपल्या मुलाचा खून झाल्याचा संशय असल्यानं त्यांनी जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलिसांचा फौजफाटा फॉरेन्सिक व्हॅनसह माळेगावात दाखल झाला. सर्वप्रथम दफन केलेल्या मुलाचा मृतदेह परत बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडं परवानगी मागितली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तसंच मुलाच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -