मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद विकोपाला गेल्याचं बोललं जातंय. विदर्भातील काही जागांवरुन शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नाहीये. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) गटाने पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे खासदार संजय राऊतांनीही मोठं वक्तव्य केलंय. जागा वाटपावरून काही वाद आहेत का, असा प्रश्न राऊतांना विचारला असता महाविकास आघाडीमध्ये काही अंतर्गत आजार आहेत. आजच्या बैठकीत काही एक्स-रे आणि एमआरआय काढावे लागतील, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. त्यामुळं या वक्तव्याचे तर्कवितर्क काढले जात असून, ठाकरे काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आम्ही नाराज नाही : महाविकास आघाडीमध्ये तुम्ही नाराज आहात का? काँग्रेस हायकमांडला तुमची नाराजी कळवली आहे का? असा प्रश्न राऊतांना विचारला असता ते म्हणाले, आम्ही नाराज असण्याचं कारण नाही. काँग्रेस हायकमांडला नाराजी कळवण्याचा अजिबात प्रश्न नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. पक्षामध्ये आम्हाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आमच्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील बैठका आणि चर्चांमध्ये आमची उपस्थिती असते. महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळतो. भाजपाच्या बगलबच्चांचा आम्हाला पराभव करायचा आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी लढत आहोत. मधल्या काळात त्याचा परिणाम म्हणून आम्हाला तुरुंगात जावं लागलं. आमच्या कुटुंबाला आणि मुलांना ईडी, सीबीआयने त्रास दिलाय. विविध यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलीय. तरीसुद्धा आम्ही लढत आहोत. तेव्हा भारतीय जनता पक्षातील नेत्यांशी कसं लढायचं हे आम्हाला माहीत आहे, आम्ही लढू, असंही संजय राऊत म्हणालेत.
जाहीरनाम्यावर चर्चा : दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गटांमध्ये) वाद असल्याचं बोललं जातंय. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद विकोपाला गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना रविवारी दुपारी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीय. या भेटीचे कारण आदित्य ठाकरेंना विचारलं असता, जाहीरनाम्यातील काही एक-दोन महत्त्वाचे मुद्दे होते, त्याच्यावर चर्चा करण्यास आलो होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. मात्र महाविकास आघाडीतील विदर्भातील जागा वाटपाच्या वादावर आदित्य ठाकरेंना विचारलं असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. आपण यावर नंतर बोलू, असं म्हणून आदित्य ठाकरे निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपावरून जो वाद सुरू आहे, त्यावर दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते दिल्लीत काँग्रेसच्या हाय कमांडबरोबर बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा करीत असल्याचीही माहिती मिळालीय.
हेही वाचा