मुंबई : भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यावर वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रतन टाटा यांच्या कुटुंबियांसह उद्योग, राजकारण यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती वरळी स्मशानभूमीत दाखल झाले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी व्हीआयपी व्यक्तींसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
टाटा प्रेमींना स्मशानभूमीत प्रवेश : रतन टाटांनी केलेलं सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. त्यामुळं देशभर रतन टाटांचे प्रेमी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईत देखील रतन टाटांवर प्रेम करणारे हजारो लोक आज रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यासाठी वरळी स्मशानभूमी बाहेर दाखल झाले होते. बाहेर रस्त्यावर घोषणाबाची सुरू होती. अखेर प्रेमापुढे प्रशासन देखील झुकले आणि या सर्व टाटा प्रेमींना वरळी स्मशानभूमीत प्रवेश देण्यात आला.
मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक मंत्री, नेते या अंत्यविधीला येणार असल्यानं केंद्रीय सुरक्षा यंत्रणा व मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. त्यामुळं सामान्य नागरिकांना स्मशानभूमीत प्रवेश नव्हता. मात्र, स्मशानभूमी बाहेर रस्त्यावर जमलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानं केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री तसंच सर्व बडे नेते स्मशानातून बाहेर पडल्यावर लगेचच सर्व नागरिकांना स्मशानभूमीत प्रवेश देण्यात आला.
'रतन टाटा अमर रहे'च्या घोषणा : ज्यावेळी या सर्व लोकांना आत घेण्यात आले, तोपर्यंत टाटा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. मात्र, या सर्व उपस्थिततांना टाटा यांच्या अंतिम दर्शन घ्यायचं असल्यानं पोलिसांनी विद्युत दाहीनीच्या बाहेर एका छोट्या टेबलवर रतन टाटा यांची प्रतिमा ठेवली आणि मानवी साखळी करून एक एक करत लोकांना दर्शन घेण्यास सोडलं. या काळात संपूर्ण वरळी स्मशानभूमी परिसर 'रतन टाटा अमर रहे', 'भारत माता की जय' या घोषणांनी दुमदुमून गेला. अखेर म्हणतात ना 'मरावे परी कीर्ती रूपे उरावे' याचा प्रत्यय मुंबईकरांना आज आला.
हेही वाचा