छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Independence Day Unique Celebration : 15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळं प्रत्येकाच्या राष्ट्रभक्तीला उधाण येतं. काहीजण तिरंगा झेंडा खरेदी करून आपल्या घरावर फडकवतात. तर काहीजण देशाप्रती असलेलं आपलं राष्ट्रप्रेम आपल्या कृतीतून व्यक्त करतात. गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील लॉन्ड्री व्यावसायिक शंकर चित्ते हे राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून देतात. ते आपलं राष्ट्रप्रेम कृतीमधून दाखवत आहेत. त्यांच्या या कृतीचं परिसरात कौतुक होतंय.
देशाविषयी प्रेम असल्यानं मोफत सेवा : आजच्या युगात कोणतंही काम करायचं असेल तर पैसे मोजावे लागतात. एखादं चांगलं काम असलं तरी पैसे न घेता घर कसं चालणार? मात्र, परिस्थिती बिकट असली तरी परिसरातील चार गावातील सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी आणि निमसरकारी संस्था यांच्याकडं असलेले राष्ट्रध्वज मोफत इस्त्री करून देण्याचं काम शंकर चित्ते करतात. लक्ष्मी लॉन्ड्री नावाचं त्यांचं दुकान यासाठी प्रसिद्ध आहे.
सेवेनं आनंद आणि समाधान - सीमेवर देशाचं संरक्षण करणारे सैनिक, जगात देशाचं नाव मोठं करणारे खेळाडू यांच्याकडून त्यांना देशप्रेमाची प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी शोधली. आपणदेखील देशासाठी काही करावं, असं वाटत असल्यानं स्वातंत्र्यदिनासह, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनासाठी ते राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री करून देतात. गेली दहा वर्ष ते मोफत सेवा देऊन देशाबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करतात. या सेवेनं आनंद आणि समाधान मिळत असल्याची भावना शंकर चित्ते यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलून दाखवली.
मुलांच्या गणवेशाला मोफत इस्त्री : ते गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाची मोफत इस्त्री करून देत आगळीवेगळी देशसेवा करत आहेत. "भावी पिढी चांगली शिकावी, त्यांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ध्वजारोहण सोहळ्यात गरीब घरातील मुलंदेखील चांगली दिसावीत. देशाचे भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी गणवेश मोफत इस्त्री करत आहे," असं शंकर चित्ते यांनी सांगितलं. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळं परिसरातील गावांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झालीय. देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाला सीमेवर जाण्याची गरज नसते. देशातील गोरगरिबांना मदत करूनदेखील ती करता येते, असा संदेश या निमित्तानं शंकर चित्ते यांनी दिलाय.
हेही वाचा -
- रामोजी फिल्म सिटीमध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, पाहा व्हिडिओ - Independence Day Celebration
- मुख्यमंत्री ध्वजारोहण करताना उडाला गोंधळ; दोरी गठ्ठ बांधल्यानं उघडला नाही ध्वज अन्.... पाहा व्हिडिओ - CM Eknath Shinde Flag Hoisting
- भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास सक्षम; लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एल्गार - Independence Day 2024