चंद्रपूर Chandrapur Rape Case : बदलापूर आणि कोलकाता येथील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. या घटनांमुळं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. यापूर्वीही अशा घटना घडत होत्या. मात्र, सामाजिक स्तरावर त्याची फारशी चर्चा होत नव्हती. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांत महिला अत्याचाराच्या घडलेल्या क्रूर घटनांमुळे सामाजिक असंतोष निर्माण होऊ लागला आहे. कारण अल्पवयीन मुलींसह दिव्यांग महिलांवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्याविरोधात जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी मशाल यात्रा काढून संताप व्यक्त केला. मात्र, त्यानंतरही अशा घटना थांबत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. तसंच काल बल्लारपूर येथं घडलेल्या दोन घटनांमुळं चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हादरला. या प्रकरणात दिव्यांग महिलेवर प्राणघातक हल्ला झाला, तर अन्य एका घटनेत अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस, शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचं काय मत आहे ते जाणून घेऊ.
जनजागृतीसाठी प्रभावी-व्यापक पावलं उचलणार : बलात्काराच्या घटना चिंताजनक असल्याचं वास्तव जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमाक्का यांनी मान्य केलं. "बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन ठोस पावलं उचलत आहे. याआधी घडलेल्या घटना भीती किंवा बदनामीच्या कारणास्तव नोंदवल्या जात नव्हत्या. मात्र आता घटनांची नोंद होत असल्यानं कारवाई होतेय. जिल्ह्यातील निर्जन ठिकाणांची माहिती जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांकडून मागवण्यात आलीय. बेकायदा मद्यपान करणाऱ्या अड्डयांवरही कारवाई करण्यात येतेय. 'भरोसा' सेलच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांमधील 'पॉक्सो' कायदा आणि त्यासंबंधीच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधलं जातंय. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याबाबतची जागृती केली जात आहे," असं सुदर्शन मुमाक्का यांनी स्पष्ट केलं.
चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात 'चंद्रपूर जागृती मशाल मंच'च्या वतीनं 31 ऑगस्ट रोजी रात्री 'मशाल मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं लोकांनी सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.
लवकरच बैठक घेऊन कृती आराखडा ठरवू : चंद्रपूर जागृती मशाल मंचच्या सदस्या पारोमिता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, "बलात्काराच्या घटना दुर्दैवी आणि संतापजनक आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा केलीय. या संदर्भात येत्या 6 सप्टेंबर रोजी आमच्या मंचच्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत सविस्तर चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. बलात्काराच्या घटना कशा रोखता येईल, अशा घटनांची पोलीस ठाण्यात नोंद कशी होईल आणि तपास गतीनं कसा होईल, यावर लक्ष केंद्रित केलं जाणार."
चंद्रपूरात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना : नागभीड येथं एका मनोरुग्ण महिलेवर पाच आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी याच तालुक्यात चॉकलेटचं अमिष दाखवून दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग करण्यात आला. वरोरा येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या दोन शिक्षकांनी 11वीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. दुर्गापूर येथं एका 55 वर्षीय नराधमानं 16 वर्षीय मुलीवर तंबाखू न दिल्यानं बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानं ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
बल्लारपूरमध्ये एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्या. एका 35 वर्षीय दिव्यांग महिलेवर 55 वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत 17 वर्षीय तरुणीवर एका साखळी कंपनीशी संलग्न हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली. चंद्रपुरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते काय पावलं उचलतात, याकडे चंद्रपूरकरांचं लक्ष आहे.
हेही वाचा
- विनयभंगाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक वाहनातून उडी मारून फरार; पोलिसांची धावाधाव - Child Accused Escaped Police
- तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide
- तीन मुलांची आई पतीला सोडून राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये; प्रियकरानं चिमुकल्याचं डोक आपटून केला खून - Man Killed Live In partners Boy