मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून बांद्रा पश्चिम वांद्रे रिक्रमेशन येथे एमएसआरडीच्या जागेत संगीत उद्यान तयार करण्यात आलं. या उद्यानाला 'आशा सरगम उद्यान' असं नाव देण्यात आलं. शुक्रवारी या उद्यानाचं उद्घाटन ज्येष्ठ गायिका तथा महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी एमएसआरडीसी मधील अधिकारी तसंच विविध मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटनानंतर बोलताना आशा भोसले म्हणाल्या की, "माझ्या नावानं उद्यान होतं, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. हे अतिशय सुबक, सुंदर उद्यान बघून मी खूप भारावून गेले. माझ्या नावानं उद्यान होणं हा माझ्यासाठी पुरस्कार असल्याचं आशा भोसले यांनी सांगितलं.
देशातील पहिलंच खुलं संगीत उद्यान : " 'आशा सरगम उद्यान' हे खुलं संगीत उद्यान आहे. येथे साऊंड सिस्टिम आहे. हौशी गायक किंवा वादक असतील ते येथे सायंकाळी गाणी गाऊ शकतात. तसंच अतिशय सुबक, टुमदार, विद्युत रोषणाई आणि गौतम राज्याध्यक्ष यांनी साकारलेलं आशाताई भोसले यांची प्रसन्न मुद्रा छायाचित्रं हे या उद्यानाचं खास वैशिष्ट्य आहे. आधी संपूर्ण परिसर मोकळा होता. मी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की, या ठिकाणी जनतेसाठी उद्यान व्हावं. त्यानंतर त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं. संपूर्ण परिसरात वरिष्ठ नागरिक या उद्यानाचा आनंद घेतील. यासाठी कल्पना पुढे आली आणि त्यातून हे देशातील पहिलं खुलं संगीत उद्यान साकारलं. मला सहकार्य केलं त्यां सर्वांचे मी आभार मानतो. ज्यांना गायनाची आवड आहे, त्यांनी या उद्यानाचा अनुभव घ्यावा," असं आशिष शेलार म्हणाले.
मी भारावून गेले : "हे उद्यान पाहून मी भारावून गेले. माझ्या नावाचं उद्यान होईल, असं वाटलं नव्हतं. या उद्यानात गायकांसाठी सर्व सुविधा आहेत. साऊंड सिस्टिम, गाणे गाण्याची सुविधा आहे. आशिष शेलार माझे भाऊ आहेत. त्यांनी अतिशय छान आणि उत्कृष्ठ असं उद्यान तयार केलंय. आशिष यांनी मला भरभरुन प्रेम दिलं. मी सर्वांचे आभार मानते. आज माझ्या नावानं उद्यान बनलंय, याचा आनंद आहे. मला संपूर्ण महाराष्ट्र फिरायचा आहे. आशाताईंनी यावेळी "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात..., सख्या रे..." हे गाणं गायले. ज्यांना गायनाची आवड त्यांनी या उद्यानात अवश्य यावं. असं आवाहन आशाताईंनी केलं. आशाताईंना पाहण्यासाठी चाहत्यांन मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा