मुंबई Maharashtra Weather Update : शनिवारी सायंकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान पावसानं उसंत घेतली. मागील दोन दिवस मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं पुढील 3 दिवसात मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्याला येलो अलर्ट जारी केला. सोबतच हवामान विभागानं कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे कोकणच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागानं केलं आहे.
राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता : हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार ते अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. मात्र, पालघर, ठाणे आणि मुंबईत 25 जुलैपर्यंत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरीसाठी आज आणि उद्या म्हणजे, 22 आणि 23 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, 24 जुलैपर्यंत पालघर, ठाणे आणि मुंबई या शहरांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या तीन शहरात 25 जुलै रोजी मध्यम ते सामान्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या शहरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं भारतीय हवामान विभागानं नमूद केलं आहे.
मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीवर परिणाम : मुंबईत मागील दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवर देखील झाल्याची माहिती आता समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामान आणि कमी दृश्यमानता यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण वाहतूक दोन वेळा काही काळासाठी थांबवण्यात आली. रविवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत एअर इंडिया, इंडिगो, अक्सा एअर लाईनची किमान 15 उड्डाणं जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. या काळात 36 उड्डाणं रद्द करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :