पुणे : मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री पुणे शहरासह सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, पब चालकाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. मात्र असं असलं, तरी ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी (Thirty First Party) करून ड्रिंक पिऊन अनेकवेळा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या घटना घडतात. हीच बाब लक्षात घेता आता पुणे शहरातील हॉटेल्स असोसिएशनच्या वतीनं एक नियमावली बनवण्यात आल्याची माहिती, हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.
३१ डिसेंबर रोजी पार्टी केल्यावर ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालकच अश्या व्यक्तींना स्वतःच्या पैश्याने कार करून घरी सोडणार आहेत. - गणेश शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल्स असोसिएशन
हॉटेल असोसिएशननं बनविली नियमावली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आलीय. तर दुसरीकडं पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. असं असताना आता हॉटेल चालकांनी देखील खबरदारी घेतली आहे. शासनाकडून ३१ डिसेंबर रोजी हॉटेल पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं मोठ्या उत्साहात नागरिकांकडून नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. मात्र असं असलं, तरी खबरदारी म्हणून हॉटेल असोसिएशननं देखील नियमावली बनवली आहे, अशी माहिती गणेश शेट्टी यांनी दिली.
एक दिवस ग्राहकांसाठी : याबाबत हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की, "सर्वप्रथम आम्ही शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसारच आम्ही पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत. तसेच खबरदारी म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीनं जास्त ड्रिंक केल्यास त्याला ड्रिंक सर्व्ह करणं बंद करणार आहे. तसेच त्यांच्या ग्रूपमधील लोकांना देखील आम्ही सांगणार आहोत की, यांना आता ड्रिंक करणे तुम्ही थांबवा. त्याचबरोबर आम्ही आमच्या स्टाफला देखील सूचना दिल्या आहेत की, कोणीही वादविवाद करू नये सर्वांनी शांततेत आपली ड्युटी करावी. तसेच आम्ही आमच्या ग्रूपमधील कार चालकांना देखील सांगितलं की, ३१ डिसेंबरला रात्री एक ते दीड नंतर आपण तयार रहा. कारण एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला आम्हीच कारने घरी सोडणार आहोत. मग जरी त्यांनी त्यांची दुचाकी किंवा कार आणली असेल तरी, आम्ही त्यांना घरी सोडणार आहोत. कारण हे लोक आमचे ग्राहक असून एक दिवस ग्राहकांसाठी असा निर्णय आम्ही घेतला आहे." अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.
हॉटेल्समध्ये विविध ऑफर : शहरातील हॉटेल्स व्यवसायिकांकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पुणे शहरात फक्त पुणे नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील लोक देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने विविध ऑफर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवण्यात आल्या आहेत. काही हॉटेलमध्ये तर दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्राहकांची पूर्ण खबरदारी हॉटेलकडून घेण्यात आली आहे, असं देखील यावेळी शेट्टी यांनी सांगितलं.
हेही वाचा -