पुणे Manorama Khedkar Judicial Custody : वादग्रस्त प्रशिक्षणार्थ आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार आहे. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौड पोलिसांनी महाडमधून अटक केली होती.
न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला : मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधील घरगुती लॉजमधून अटक केली. तर त्यांचे सहआरोपी असलेले पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांना जामीन मिळाला आहे. मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा न्यायालयानं खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरमा खेडकर यांनी लगेच जामीन अर्ज दाखल केला. मात्र, त्यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला.
मनोरमा खेडकर यांचे वकील काय म्हणाले? : माध्यमांशी संवाद साधताना मनोरमा खेडकर यांचे वकील निखिल मलाणी म्हणाले, "मनोरमा खेडकर यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये तपास पूर्ण झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्यांना कोठडीची आवश्यकता नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर न्यायालयाकडून खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज आम्ही न्यायालयात दाखल केला होता. मात्र, खेडकर यांच्यावर असलेला 307 चा गुन्हा हा जिल्हा न्यायालयानं चालवण्यासारखा असल्यानं पौड न्याय दंडाधिकारी न्यायालायकडून हा अर्ज नामंजूर करण्यात आलाय."
हेही वाचा -
- मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ; वकिलांनी काय केला युक्तिवाद? - Manorama Khedkar
- पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ; मनोरमा खेडकर यांच्या कंपनीला महानगरपालिकेनं ठोकलं टाळं, काय आहे प्रकरण? - IAS Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना पाचाड येथील लॉजिंगमधून पहाटे अटक, पाहा सीसीटीव्ही फुटेज - Manorama Khedkar arrested