पुणे Pooja Khedkar IAS Case : ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत सतत धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला दिव्यांग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण, त्यानंतर सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर राहणं आणि 17 कोटी रुपयांची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीला दिलेल्या माहितीत आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं सांगितलंय. या प्रकरणावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय.
चौकशीसाठी समितीची स्थापना : पूजा खेडकर प्रकरणी चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच ही समिती दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रायलानं अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात पूजा खेडकर यांची यूपीएससी मध्ये झालेली निवड आणि इतर संबंधित बाबींची समितीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
The allegations against #IAS officer Pooja Khedkar are a serious reputational hazard to the service. Are you in government to serve or due to a sense of entitlement?
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) July 11, 2024
I urge Maharashtra’s Chief Secretary to conduct a comprehensive & impartial investigation into these allegations…
- पदावरून काढलं पाहिजे : पुण्यात रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, "पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा उठवला असेल तर ते चुकीचं आहे. याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. यात त्या दोषी आढळल्यास त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे."
निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळाव्यात : यावेळी रामदास आठवले म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत. तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचं काम केलं. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणूकीत किमान 10 ते 12 जागा आम्हाला मिळाव्यात. तसेच ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता मराठ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा. तसेच क्रिमिलेयरची मर्यादादेखील 8 लाखांवरुन 12 लाख रुपये करावी," अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
महायुतीला 170 ते 200 जागा मिळतील : ते पुढे म्हणाले की, "आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आरपीआयला एक विधानपरिषदेची जागा मिळावी, अशी विनंती केली होती. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा. विधासभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा. महामडळांच्याही नियुक्त्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत महायुतीला 170 ते 200 जागा मिळतील." असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी चौकशी करावी-मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केली. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत पूजा खेडकर यांच्यावर टीका केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले," ज्यांच्यासाठी गुणवत्ता आणि नैतिकता महत्त्वाची नाही, ते आयएएससारखी पदे भूषवण्यास योग्य नाहीत.खेडकर यांच्यावरील आरोप हे आयएएसची प्रतिष्ठा बिघडवित आहेत. यूपीएससी हे उच्च दर्जाचे अधिकारी घडविण्यासाठी ओळखली जाते. न्याय देणे आणि प्रशासकीय सेवेवरील जनतेचा विश्वास जपणे महत्वाचे आहे."
हेही वाचा
- पूजा खेडकर यांच्या आईनं घातला पोलिसांसोबत वाद; 'ऑडी'वर तब्बल 'इतका' फाईन, पाठवली नोटीस - Controversial IAS Pooja Khedkar
- दिव्यांग असल्याचं सांगून पूजा खेडकर झाल्या IAS? खेडकर आहेत 17 कोटींची संपत्तीच्या मालकीण - IAS Officer Pooja Khedkar
- दृष्टिदोष दाखवून पूजा खेडकर आयएएस, सरकारनं चौकशी करावी; सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी - Pooja Khedkar IAS