चंद्रपूर Moushi Village Murder Case : जिल्ह्यात खुनाच्या घटनेत चिंताजनक वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना कुऱ्हाडीनं संपविल्याची घटना कोरपना तालुक्यात घडली. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच एका नराधमानं कुऱ्हाडीनं वार करत आपल्या पत्नीसह दोन मुलींना झोपेतच संपवले. ही घटना आज रविवारी (3 मार्च) उघडकीस आली. नागभीड तालुक्यातील मौशी या गावातील ही थरारक घटना आहे. अंबादास लक्ष्मण तलमले (वय 45) असं नराधमाचं नाव आहे.
आरोपीला होते दारूचे व्यसन: प्राप्त माहितीनुसार, आरोपी अंबासास तलमले हा काहीच काम करत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे नेहमीच घरी खटके उडत होते. त्याला पत्नी अलका अंबादास तलमले (वय 40), प्रणाली (वय 19) आणि तेजस्वीनी (वय 16) अशा दोन मुली आणि अनिकेत तलमले हा मुलगा होता. मुलगा अनिकेत दहावीत कृषक विद्यालय मौशी येथे शिकत असून तो दहावीचे पेपर देत आहे. तर मृतक तेजस्विनी हीसुद्धा कृषक विद्यालय मौशी येथे ती बारावीची परीक्षा देत होती. आरोपी अंबादास तलमले हा नेहमी दारू पिऊन पत्नी आणि मुलींना त्रास द्यायचा. दारू पिण्यासाठी वारंवार पैश्याची मागणी करायचा. आरोपीची पत्नी आणि दोन्ही मुली मोलमजुरी करायच्या.
झोपेत तिघांनाही संपवले: अंबादासच्या घरी दररोज कौटुंबिक वाद व्हायचे. काल त्याची पत्नी आणि मुली झोपल्या असताना यावेळी आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात या तिघींचा जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.
मुलगा थोडक्यात बचावला: मुलगा अनिकेत तलमले हा हॉटेलमध्ये काम करायचा. तो आज सकाळीच चार वाजता घरून निघून गेला होता. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.
आरोपी कुऱ्हाड घेऊन झोपायचा: आरोपी अंबादास हा गेल्या तीन महिन्यांपासून झोपताना कुऱ्हाड घेऊन झोपायचा. पत्नी आणि मुलींनी विचारले असता स्वतःच्या रक्षणासाठी घेऊन झोपतो, असं उत्तर द्यायचा. मात्र त्याच्या मनात काही वेगळंच सुरू होतं.
आरोपीनं फोडली टीव्ही: आरोपी गावातील अनेकांशी हुज्जत घालायचा. 15 दिवसांपूर्वी गावातील एका घरी शिरून त्याने टीव्ही फोडल्याची माहिती आहे. घटनास्थळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली. पुढील चौकशी ठाणेदार विजय राठोड करीत आहे.
हेही वाचा:
- भाजपात प्रवेश करणार का ? खासदार नवनीत राणांनी स्पष्टचं सांगितलं; 'उद्या जेपी नड्डांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन'
- भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पहिल्या यादीत पत्ता कट, दुसऱ्या यादीतील समावेशाबाबतही आहेत प्रश्नचिन्ह
- 'अजून युती झालेली नाही,...'; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण