पुणे Lonavala Karvi Flowers -: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरलेली असून, अनेक भागात डोंगरदऱ्यातील निसर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेल्या मावळ खोऱ्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या ॲम्बी व्हॅली इथे तब्बल सात वर्षांनी कारवी फुलाचा बहर आल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारवीच्या फुलांनी बहरलेलं पठार पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तसेच ही फुलं पाहण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. ओलाचिंब पावसात ही कारवीची फुलं पाहण्याची मज्जा काही वेगळीच आहे.
7 वर्षांनंतर फुलली कारवीची फुलं: मावळ खोऱ्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या ॲम्बी व्हॅली येथील या पठारावर तब्बल 7 ते 8 वर्षांनंतर आता फुललेली पाहायला मिळत आहेत. साधारण हे 25 ते 30 एकरांच्या पठारात ही फुले फुललेली पाहायला मिळत असून, निळ्या-जांभळ्या रंगातील हा फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांपासून ते अभ्यासकांपर्यंत अनेकांची पावले लोणावळ्याकडे वळत आहेत. नैसर्गिक सृष्टीचे हे विलोभनीय दृश्य महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आकर्षणचे केंद्रबिंदू ठरले आहे. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईसह लांबून लोक इथे भेट देण्यासाठी येत आहेत. तसेच फोटो, रीलदेखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक तयार करीत आहेत. तरुण-तरुणी पर्यटकांसाठीही कारवीच्या फुलांनी बहरलेलं हे पठार सेल्फी पॉइंट बनलं आहे.
कारवीच्या फुलांचं पर्यटकांना आकर्षण: कारवीची फुलं हे एक दुर्मीळ झुडूप असून, प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या सखल टेकड्यांमध्येच ती फुले फुललेली पाहायला मिळतात. एकाच रंगामध्ये ही सगळी फुलं बहरल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतात. खरं तर कारवीची फुलं फुललेल्या पठारावर नजर जाईल तिथपर्यंत ही फुलं दिसत असल्यानं ते दृश्य पर्यटकांसाठी नयनरम्य आहे. कारवी नावाच्या फुलांचा बहर लोणावळ्यात आल्यामुळे आता लोणावळ्याच्या पर्यटकांना त्याची भुरळ पडली आहे. कारवीची ही फुलं आणखी काही दिवस लोणावळ्याजवळ असलेल्या ॲम्बी व्हॅली परिसरात पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचाः
कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू; पर्यटकांसाठी 'हा' काळ फिरण्यास योग्य - Kaas Pathar Satara